IND vs PAK: ईशान किशनचा ऐतिहासिक पराक्रम; धोनी-पंतलाही न जमलेलं काम करत ठरला पहिला भारतीय!

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्याची सर्वत्र उत्सुकता होती आणि भारतीय संघाने चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 बाद 175 धावांचा भक्कम स्कोर उभारला. कोलंबोची संथ खेळपट्टी आणि पाकिस्तानकडून तब्बल सहा फिरकीपटूंचा वापर एकूण 18 षटके फिरकी असतानाही भारताने आक्रमक फलंदाजी करत मजबूत धावसंख्या गाठली.

भारताची सुरुवात मात्र खराब झाली. डावाच्या पहिल्याच षटकात सलामीवीर अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला आणि संघावर दबाव आला. मात्र त्यानंतर विकेटकीपर फलंदाज ईशान किशन यांनी जबाबदारी स्वीकारली. त्याने संयम आणि आक्रमकता दाखवत पाकिस्तानी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ईशानने अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी साकारली. त्याच्या डावात 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. पॉवरप्लेमध्ये त्याने संघाला मजबूत पाया दिला आणि मधल्या षटकांतही धावगती कायम ठेवली.

या शानदार कामगिरीबद्दल ईशान किशनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या सन्मानासह तो टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सामनावीर ठरणारा पहिला भारतीय विकेटकीपर-फलंदाज ठरला. आयसीसी स्पर्धांमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो चौथा भारतीय विकेटकीपर आहे. याआधी फारुख इंजिनिअर, महेंद्रसिंह धोनी आणि केएल राहुल यांनी वनडे वर्ल्ड कपमध्ये हा मान मिळवला होता.

याशिवाय पाकिस्तानविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रमही आता ईशानच्या नावावर गेला आहे. यापूर्वी हा विक्रम भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या नावावर होता. त्याने 2007 च्या टी20 वर्ल्ड कप अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 75 धावा केल्या होत्या. ईशानच्या 77 धावांच्या खेळीने तो विक्रम मागे टाकला.

फलंदाजीतील भक्कम कामगिरीनंतर भारतीय गोलंदाजांनीही शिस्तबद्ध मारा करत पाकिस्तानला पुनरागमनाची संधी दिली नाही आणि भारताने आणखी एक ऐतिहासिक विजय आपल्या नावावर नोंदवला.

Comments are closed.