भारतावर विजय मिळताच पाक टीमचे आक्रमक सेलिब्रेशन; VIDEO VIRAL

कतरची राजधानी दोहा येथे एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेचा सहावा सामना 16 नोव्हेंबरला खेळवण्यात आला. भारत-अ आणि पाकिस्तान-अ यांच्यात झालेल्या या रोमांचक सामन्यात पाकिस्तान-अ संघाने 8 विकेट्सने विजय मिळवत उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले.

टॉस गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाचा डाव 19 षटकांत 136 धावांवर आटोपला. भारतासाठी सलामीवीर वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक 45 धावा करत जबाबदारी पार पाडली. त्याने 28 चेंडूंत 5 चौकार आणि 3 षटकारांसह आकर्षक खेळी केली. नमन धीरनेही 20 चेंडूंवर 35 धावांचे योगदान देत डावाला आधार दिला. मात्र इतर फलंदाजांनी निराशा केली आणि संघ 150 धावांचाही टप्पा गाठू शकला नाही.

136 धावांचे साधे लक्ष्य पाकिस्तान-अ संघाने केवळ दोन गडी गमावून 14व्या षटकात पूर्ण केले. नमन धीरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद फैकने जबरदस्त षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. विजयानंतर त्याने दोन्ही हात हवेत उंचावत आक्रमक जल्लोष केला आणि नंतर तोंडावर बोट ठेवून ‘शांत बसा’ असा इशारा करत अनोखी सेलिब्रेशन स्टाईल दाखवली. त्यानंतर फैक आणि माज सदाकतने मैदानात सजदा करून आनंद व्यक्त केला.

या सामन्यात ‘नो-हँडशेक’ प्रकरणही विशेष चर्चेत राहिले. सामन्यापूर्वी राष्ट्रगीतांनंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांकडे दुर्लक्ष केले. सामन्यानंतरदेखील भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता मैदान सोडले. वरिष्ठ संघाने सप्टेंबरमध्ये आशिया कपदरम्यान सुरू केलेला हा ट्रेंड रायजिंग स्टार्स स्पर्धेतही कायम असल्याचे पाहायला मिळाले.

पाकिस्तान-अ संघाचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी 14 नोव्हेंबरला ओमानचा पराभव करत मोहीम दमदारपणे सुरू केली होती. आता पाकिस्तान-अ 18 नोव्हेंबरला यूएईविरुद्ध आपला तिसरा लीग सामना खेळणार असून उपांत्य फेरीत स्थान अधिक मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

Comments are closed.