‘फरहाननं AK-47 चालवली तर भारतानं ब्रह्मोसचा मारा केला’ पाकच्या माजी क्रिकेटपटूनं टीमला सुनावलं
नवी दिल्ली : आशिया चषकातील सुपर फोरच्या लढतीत भारतानं पाकिस्तानला 6 विकेटनं पराभूत केलं. पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाज करताना 171 धावा केल्या. दुबईच्या मैदानावर ही धावसंख्या विजयासाठी पुरेशी मानली जाते. मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील भारतीय संघानं सहजपणे पाकिस्तानवर विजय मिळवला.
भारताचे सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा या दोघांनी 59 बॉलमध्ये 105 धावांची भागीदारी केली. गिलनं 47 धावा केल्या तर अभिषेक शर्मानं 39 बॉलमध्ये 74 धावा केल्या. अभिषेक शर्मानं त्याच्या वादळी खेळीत सहा चौकार आणि पाच षटकार मारले. दोघे बाद होईपर्यंत मॅच भारताच्या हातात आली होती. तिलक वर्मानं 30 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान यानं 58 धावा केल्या. फरहान यानं अर्धशतक केल्यानंतर गनशॉट सेलीब्रेशन केलं. त्याच्या या कृतीवर अनेकांनी टीका केली. अनेक माजी खेळाडूंनी आक्षेप घेत आरोप केले की त्यानं पहलगाममधील निरपराध मृतांची खिल्ली उडवली. मात्र, फरहान यानं ते आरोप फेटाळले आहेत.
दानिश कनेरियाचं पाकिस्तानवर टीकास्त्र
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यानं पाकिस्तानच्या लाजीरवाणया पराभवावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. गिल आणि अभिषेक यांच्या फलंदाजीमुळं पाकिस्तानच्या टीमला धक्का बसला. कनेरियानं आयएनएस सोबत बोलताना म्हटलं की, ‘साहिबजादा फरहाननं AK-47 ची ॲक्शन केली मात्र शुभमन गिल आणि अभिषेक शर्मानं त्यांच्या बॅटनं ब्रह्मोसचा मारा केला. शर्मानं तर फ्लाइंग किस देखील दिला, हेच खरं उत्तर आहे. भारतीय सलामीवीरांचा प्रतिहल्ला इतका जोरात होता की पाकिस्तानी खेळाडू हतबल झाले. धुलाई आणि महाधुलाईत फरक असतो, ही महाधुलाई होती’, असं कनेरिया म्हणाला.
कनेरियानं फकर जमानच्या विकेटसंदर्भात बोलताना म्हटलं की तो आऊट होता. पाकिस्ताननं विनाकारण वाद निर्माण केल्याचा आरोप कनेरियानं केला. पाकिस्तान आता आणखी एक कारण शोधेल, आता रडगाणं गातील फखर जमान बाद नव्हता, मात्र तो स्पष्ट पणे कॅछ होता. संजू सॅमसनचे ग्लोव्ज बॉलच्या खाली होती. पाकिस्तान रडगाणं सुरु ठेवेल आणि बेनेफिट ऑफ डाऊटचा विषय काढतील, असं दानिश कनेरिया म्हणाला.
दरम्यान, आता आशिया चषकात पाकिस्तानला आव्हान कायम ठेवायचं असल्यास श्रीलंका आणि बांगलादेशवर मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल. बांगलादेश आणि भारतानं सुपर फोरमध्ये एक एक सामना जिंकला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.