IND vs PAK: 100 षटकार अन् वर्ल्ड रेकॉर्ड, स्मृती मानधना पाकिस्तानविरुद्ध ‘डबल धमाका’ करण्यास सज्ज!

महिला आशिया कप 2026 मध्ये आज (शनिवार, 5 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान समोरा-समोर येणार आहेत. या सामन्यात पाकिस्तानसमोर स्मृती मानधनाचे आव्हान असणार आहे. भारतीय स्टार फलंदाजाला या सामन्यात दोन विक्रमे करण्याची संधी आहे. तिने मागील सामन्याप्रमाणे खेळी केली, तर पाकिस्तानची काही खैर नाही.
दुबईमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत स्मृतीला आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 100 षटकार पूर्ण करण्याची आणि सर्वाधिक धावा करणारी पहिली महिला खेळाडू बनण्याची संधी आहे. स्मृतीने या स्पर्धेच्या आपल्या मागील सामन्यात म्हणजे हॉंग कॉंग विरुद्ध 64 चेंडूंत 124 धावा केल्या, ज्यामध्ये 14 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे. तिने अशीच कामगिरी पाकिस्तानविरुद्ध केली, तर पाकिस्तानला आणखी एका संकटापासून कोणीही वाचवू शकणार नाही.
महिलांच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या न्यूझीलंडच्या सुझी बेट्सच्या नावावर आहे. तिने 186 सामन्यांमध्ये 4758 धावा केल्या आहेत. स्मृतीने 173 सामन्यांमध्ये 4681 धावा केल्या आहेत. त्यामुळे तिला सुझीला मागे टाकण्यासाठी 78 धावांची आवश्यकता आहे.
पाकिस्तानविरुद्ध स्मृतीने जबरदस्त कामगिरी केली तर ती सुझीचा विश्वविक्रम मागे टाकेल. तसेच तिला 100 टी20 आंतरराष्ट्रीय षटकार करण्याची संधी आहे. सध्या स्मृतीने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 95 षटकार मारले आहेत. तिने हे खास शतक पूर्ण केले तर ती टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 षटकार मारणारी पहिली महिला भारतीय ठरेल.
भारत उपांत्य फेरीसाठी पात्र
या स्पर्धेत भारत गट अ मध्ये आहे. यामध्ये पाकिस्तान, थायलंड आणि हॉंग कॉंग यांचाही समावेश आहे. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत खेळल्या दोन पैकी दोन्ही सामने जिंकले आहेत. यामुळे ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
पाकिस्तानने एकच सामना खेळला असून तो जिंकला आहे, मात्र त्यांना स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी भारताविरुद्ध विजय आवश्यक आहे.
उपांत्य फेरीचे सामने 10 आणि 11 सप्टेंबर रोजी, तर अंतिम सामना 13 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. (IND vs PAK Smriti Mandhana eye on 100 sixes and most runs in women T20I, Asia Cup 2026)
Comments are closed.