संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
अहमदाबाद: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी 20 सामना उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह कमबॅक करेल. वैयक्तिक कारणामुळं बुमराह तिसऱ्या टी 20 मॅचसाठी उपलब्ध नव्हता. दुसरीकडे शुभमन गिल दुखापतीमुळं बाहेर गेल्यानं संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. चौथा टी 20 सामना धुक्यामुळं रद्द करावा लागल्यानं संजू सॅमसनची चौथ्या सामन्यात खेळण्याची संधी हुकली होती. आता पाचव्या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळू शकते.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 नं आघाडीवर आहे. भारतानं कटक आणि धर्मशाला येथील सामन्यात विजय मिळवला होता. तर, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताला पराभूत केलं होतं. भारताकडे अहमदाबाद येथील सामना जिंकून मालिकेत 3-1 अशी आघाडी मिळवण्याची संधी आहे. तर, दक्षिण आफ्रिकेकडे मालिकेत शेवटच्या सामन्यात विजय मिळवून बरोबरी करण्याची संधी आहे.
बुमराह आणि संजू सॅमसनचं कमबॅक
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या टी 20 मालिकेत संजू सॅमसनला आतापर्यंत संधी मिळालेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत त्याला दोन सामन्यात संधी मिळाली होती. त्यानंतर संघ व्यवस्थापनानं जितेश शर्माला विकेटकीपर म्हणून संधी दिली आहे. शुभमन गिल चौथ्या सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झाल्यानं संजू सॅमसनला त्या सामन्यात संधी मिळेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, लखनौ येथील सामना रद्द करण्यात आला.
शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्यानं टी 20 मालिकेतून बाहेर गेला आहे. त्यामुळं पाचव्या टी 20 सामन्यात अभिषेक शर्मासह संजू सॅमसन सलामीला येऊ शकतो, अशी शक्यता आहे. जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणामुळं तिसऱ्या टी 20 सामन्यात न खेळता घरी परतला होता. प्लेईंग इलेव्हनमध्ये अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहला संधी मिळाल्यास हर्षित राणाला बाहेर बसावं लागू शकतं. पहिल्या 3 टी 20 सामन्यात विकेटकीपर म्हणून जितेश शर्मा खेळला होता, त्याला संघात संधी मिळते का हे देखील पाहावं लागेल. जितेश शर्मानं पहिल्या सामन्यात 10 आणि दुसऱ्या सामन्यात 27 धावा केल्या होत्या.
भारताची संभाव्य प्लेईंग 11
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर/ जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग 11
रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओटेनिल बार्टमन.
आणखी वाचा
Comments are closed.