IND vs SA: गिलचा सहभाग धोक्यात! दुसऱ्या कसोटीपूर्वी रुग्णालयाकडून महत्त्वाची माहिती समोर

टीम इंडियासाठी कसोटीतले दिवस काही केल्या सुधारत नाहीत. घरच्या मैदानावरही पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये कर्णधार शुबमन गिल जखमी झाल्याने दुसऱ्या सामन्यात त्याची उपलब्धता संशयास्पद मानली जात आहे. गुवाहटीत 22 नोव्हेंबरपासून होणाऱ्या सामन्यापूर्वी बीसीसीआयकडून अधिकृत अपडेटची प्रतीक्षा आहे.

पहिल्या कसोटीदरम्यान गिलला दुखापत झाल्याने तो दुसऱ्या डावात फलंदाजीला देखील आला नाही. संघ लवकरच गुवाहटीत रवाना होणार असला तरी गिलची फिटनेस चिंता वाढवणारी आहे. त्याच्या गैरहजेरीची पुष्टी झाल्यास संघ व्यवस्थापनासमोर नवे आव्हान उभे राहणार आहे.

सध्या या मालिकेसाठी रिषभ पंत उपकर्णधार आहे. त्यामुळे गिल खेळू शकला नाही, तर नेतृत्वाची धुरा पंतच सांभाळण्याची पूर्ण शक्यता आहे. भारतीय संघात पर्याय अनेक असले तरी उपकर्णधारालाच नेतृत्व देण्याची परंपरा कायम राहण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.

गिल बाहेर झाल्यास त्याच्या जागी कोणत्या फलंदाजाला संधी मिळेल, याची उत्सुकता वाढली आहे. पहिल्या कसोटीमध्ये साई सुदर्शनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. वॉशिंगटन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर उतरवण्यात आले होते.
आता दुसऱ्या कसोटीसाठी साई सुदर्शनला गिलच्या जागी स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र गुवाहटीच्या पिचचा स्वभाव पाहून देवदत्त पडिक्कललाही संधी मिळू शकते.

सध्या तरी निर्णायक निर्णय गिलच्या दुखापत अपडेटवर अवलंबून आहे. बीसीसीआयकडून अधिकृत माहिती मिळताच दुसऱ्या टेस्टची टीम कॉन्फिगरेशन स्पष्ट होईल.

Comments are closed.