“कसोटी क्रिकेटला श्रद्धांजली…!” ईडन गार्डन्सच्या पिचवर हरभजन सिंगचं परखड विधान

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 30 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 124 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारतीय फलंदाजांनी सरळ शरणागती पत्करल्याचे चित्र पाहायला मिळाले आणि संपूर्ण संघ केवळ 93 धावांत गारद झाला. ईडन गार्डन्सवर तयार झालेली कमी दर्जाची, अनियमित उसळी असलेली आणि अतिशय फिरकी सहाय्यक पिच या पराभवाचे मुख्य कारण ठरली. फक्त तीन दिवसांत सामना संपल्याने या विकेटवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने या पिचवर जोरदार टीका करताना तिला ‘कसोटी क्रिकेटचा विनाश’ असे संबोधले. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना तो म्हणाला की, अशा प्रकारच्या पिचेस अनेक वर्षांपासून तयार केल्या जात आहेत, मात्र संघ विजय मिळवत असल्याने कुणीही त्यावर आवाज उठवत नाही. “संघ जिंकतोय, खेळाडू विकेट घेतायत, काहीजण त्या जोरावर महानही बनत आहेत, तेव्हा सर्व काही ठीक असल्याचे भासते. पण प्रत्यक्षात क्रिकेटचा विकास थांबत चालला आहे,” असे हरभजनने स्पष्ट केले.

यापुढे बोलताना त्याने कसोटी क्रिकेटच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आपण कुठेच प्रगती करत नाही. जणू गिरणीत बांधलेल्या बैलासारखे आपण फक्त फिरतो आहोत. विजय मिळतोय पण त्याचा कोणताही खरा फायदा होत नाही. क्रिकेटर म्हणून तुम्ही पुढे जात नाही,” असे तो म्हणाला. त्याच्या मते, अशा पिचेसमुळे फलंदाजांच्या कौशल्याची वाढ होत नाही. खेळाडूंना धावा कशा करायच्या, विविध परिस्थितींशी कसे जुळवून घ्यायचे हे कळतच नाही.

हरभजनने स्पष्ट केले की, सध्या जे काही होत आहे ते कौशल्यावर आधारित क्रिकेट नसून पिचवर आधारित क्रिकेट आहे. फलंदाज कौशल्यामुळे नव्हे तर पिचच्या अनिश्चिततेमुळे बाद होत आहेत, हे पाहून वाईट वाटते. “कसोटी क्रिकेटची ही परिस्थिती दुर्दैवी आहे. आपण असं का करत आहोत, याचं उत्तर कुणाकडे नाही,” अशी खंत त्याने व्यक्त केली.

Comments are closed.