IND vs SA: टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचा विजयी सिलसिला कायम, सलग 7वी मालिका जिंकली

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना भारतीय संघाने 30 धावांनी जिंकला आणि मालिका 3-1 ने जिंकली. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाला हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 5 गडी गमावून 232 धावा करण्यात यश आले. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दमदार सुरुवात केली पण मधल्या षटकांत विकेट गमावल्या. त्यांना 20 षटकांत फक्त 201 धावाच काढता आल्या. 2024च्या टी-20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा हा सातवा द्विपक्षीय मालिका विजय आहे.

भारताविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात 232 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स या सलामी जोडीने धमाकेदार सुरुवात करून पहिल्या सहा षटकांत धावसंख्या ६७ पर्यंत नेली. वरुण चक्रवर्तीने रीझा हेंड्रिक्सला 13 धावांवर बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर, डेव्हाल्ड ब्रेव्हिसने क्विंटन डी कॉकसह दुसऱ्या विकेटसाठी फक्त 23 चेंडूत 51 धावांची भागीदारी करत धावगती स्थिर ठेवली. जसप्रीत बुमराहने क्विंटन डी कॉकला 65 धावांवर बाद करून टीम इंडियासाठी ही धोकादायक भागीदारी मोडली.

दक्षिण आफ्रिकेच्या विकेट्स वेगाने पडल्या, जेव्हा धावसंख्या 135 पर्यंत पोहोचली तेव्हा अर्धा संघ पॅव्हेलियन मध्ये परतला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करामचा बळी देखील समाविष्ट होता, जो फक्त 6 धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत एकूण 201 धावा केल्या. वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी टीम इंडियासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. चक्रवर्तीने चार षटकांत 53 धावांत चार बळी घेतले, तर बुमराहने त्याच्या चार षटकांत फक्त 17 धावांत दोन बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्यानेही प्रत्येकी एक बळी घेतला.

या सामन्यात टीम इंडियासाठी तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या हे उत्कृष्ट फलंदाज होते. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या तिलकने 42 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी केली, तर हार्दिक पांड्याने अतिशय आक्रमक फलंदाजी शैली दाखवत फक्त 25 चेंडूत 63 धावा केल्या. याशिवाय संजू सॅमसनने 37 धावा आणि अभिषेक शर्माने 34 धावा केल्या.

Comments are closed.