‘खेळपट्टी योग्यच, फलंदाजांमुळेच सामना हातातून गेला’; गौतम गंभीरच्या समर्थनार्थ सुनील गावस्कर उतरले

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या कसोटीनंतर ईडन गार्डन्सची पिच चर्चेचा विषय ठरली आहे. अमर्यादित बाऊन्स आणि अतिरिक्‍त टर्नमुळे फलंदाजांची मोठी कसोटी झाली. त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी पिचवर कडक भाषेत टीका केली. मात्र भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पिच मागणीनुसारच तयार केली होती असे ठामपणे सांगितले. त्याच्या या टिप्पणीवर मोठी चर्चा रंगली आहे.

दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी यावर प्रतिक्रिया देत गंभीरचे समर्थन केले आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, भारताचा पराभव पिचमुळे नव्हे तर भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे झाला. गावस्कर म्हणाले, “मी गंभीरशी पूर्ण सहमत आहे. 124 धावांचे लक्ष्य आपण सहज गाठू शकत होतो.”

गावस्कर पुढे म्हणाले की, अनेक जण पिचबद्दल बोलत असले तरी खरा फरक दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या कौशल्यामुळे निर्माण झाला. “साइमन हार्मर कसा गोलंदाजी करत होता हे पाहा. त्याचे किती चेंडू टर्न घेत होते? तो कधी सरळ, तर कधी टर्नने चेंडू टाकत होता. हा मिश्रण भारतीय फलंदाजांना सतत गोंधळात टाकत होता.”

गावस्कर यांनी पिचवर होणारी टीका निराधार असल्याचे सांगितले. “तिसऱ्या दिवशी थोडासा टर्न होणं हे पूर्णपणे सामान्य आहे. केशव महाराजच्या किती चेंडू टर्न झाले? जडेजा किंवा अक्षर यांच्या गोलंदाजीमध्ये काय वेगळं दिसलं? ही पिच काही ‘अतिरिक्त टर्निंग ट्रॅक’ नव्हती. दोष आपल्या फलंदाजांच्या तंत्रात आणि त्यांच्या दृष्टिकोनात होता.” असे ते म्हणाले.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, कोलकाता कसोटी अवघ्या अडीच दिवसांत संपली. दोन्ही संघ एकदाही 200 धावांच्या पलीकडे जाऊ शकले नाहीत. भारताला विजयासाठी 124 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु संपूर्ण संघ 93 धावांवर गडगडला आणि 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. गुवाहाटीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजय किंवा ड्रॉ कोणतेही परिणाम पाहुण्यांना मालिका जिंकण्यासाठी पुरेसे ठरेल.

Comments are closed.