IND vs SA : टीम इंडियाच्या पराभवामागचा खरा दोषी कोण? ही एक चूक पडली महागात!
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूरमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. भारतीय फलंदाजांनी अचूक नियोजनासह कामगिरी करत 50 षटकांत 5 बाद 358 अशी मोठी धावसंख्या उभी केली. विराट कोहली, ऋतुराज गायकवाड आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी सामन्याला योग्य गती दिल्यानं भारताने 359 धावांचं भक्कम आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं. अशी धावसंख्या बचावणं कठीण नसावं, असा विश्वास चाहत्यांमध्ये होता.
परंतु दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी शांत आणि संयमी सुरुवात करत भारतीय गोलंदाजांना सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवलं. भारताला जलद विकेटची गरज असताना ती मिळत नव्हती. याच दरम्यान, सामन्याचा सर्वात महत्त्वाचा क्षण 18व्या षटकात आला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर एडन मार्करमने मिड-ऑनच्या दिशेने मोठा शॉट मारला. सीमारेषेवर यशस्वी जयस्वाल झेल घेणार असं वाटलं, पण चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि तो सरळ सीमारेषेबाहेर गेला. त्या वेळी मार्करम 53 धावांवर होता. झेल सुटल्यामुळे त्याला जीवदान मिळालं. त्यानंतर त्याने सामन्याचा संपूर्ण प्रवाह बदलून टाकला.
मार्करमने 98 चेंडूत 110 धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजीची अक्षरशः धुलाई केली. 10 चौकार आणि 4 षटकारांनी सजलेली त्याची खेळी दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या उंबरठ्यावर नेणारी ठरली. झेल सुटल्यावर त्याने केलेल्या अतिरिक्त 57 धावांनी सामन्यातील तिढा अधिकच वाढला. हीच संधी भारतासाठी निर्णायक ठरली. तिथून सामना भारताच्या हातातून हळूहळू निसटत गेला.
भारतीय गोलंदाजांनी सुमार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेवर दडपण आणण्यात अपयश आले. अर्शदीप सिंग वगळता एकाही गोलंदाजाने प्रभावी कामगिरी केली नाही. प्रसिद्ध कृष्णा, हार्षित राणा आणि कुलदीप यादव यांनी 6 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. फील्डिंगमधील चुका, झेल सुटणे आणि गोलंदाजांच्या अचूकतेचा अभाव. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
शेवटी, दक्षिण आफ्रिकेनं 4 विकेट आणि 4 चेंडू राखून 359 धावांचं कठीण लक्ष्य सहज गाठलं, तर भारताच्या 358 धावा व्यर्थ ठरल्या. मालिकेत आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत भारतावर दबाव वाढवला आहे.
Comments are closed.