IND vs SA: टीम इंडियाची विजयी मालिका थांबली, सुपर-8 मध्ये आफ्रिकेकडून दारुण पराभव

यंदाच्या टी-२० विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर ८ सामना झाला. या सामन्यात भारताचा ७६ धावांनी पराभव झाला. या विश्वचषकात टीम इंडियाचा हा पहिला पराभव होता. यामुळे टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची गेल्या १२ सामन्यांमधील विजयी मालिकाही खंडित झाली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाने ७ गडी गमावून १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ १८.५ षटकांत १११ धावांवर सर्वबाद झाला. टी-२० विश्वचषकात धावांच्या बाबतीत टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांच्या टॉप-ऑर्डर फलंदाज एडेन मार्करामने ४, क्विंटन डी कॉकने ६ आणि रायन रिकेल्टनने ७ धावा केल्या. तीन जलद विकेट गमावल्यानंतर, डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी ५० चेंडूत चौथ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. ब्रेव्हिसने २९ चेंडूत ४५ धावा केल्या, त्यात तीन चौकार आणि तीन षटकार मारले. डेव्हिड मिलरने ३५ चेंडूत ६३ धावा केल्या, ज्यामध्ये सात चौकार आणि तीन षटकार मारले. या दोघांसह ट्रिस्टन स्टब्सने २४ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. इतर आफ्रिकन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर अर्शदीप सिंगने दोन बळी घेतले.

भारताचा धावांचा पाठलाग खराब होता. चार चेंडूंचा सामना केल्यानंतर इशान किशन धाव न घेता बाद झाला. मागील तीन सामन्यात शून्यावर बाद झालेल्या अभिषेक शर्माने १२ चेंडूत १५ धावा केल्या. या सामन्यात तिलकही एक धावेवर बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही संथ खेळी केली. त्याने २२ चेंडूत १८ धावा केल्या. सुंदरने ११ धावा केल्या, तर हार्दिकने १८ धावा केल्या. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशी केली. या सामन्यात भारताकडून शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३७ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सनने ४ आणि केशव महाराजने ३ बळी घेतले.

Comments are closed.