IND vs SA : गुवाहाटीत पराभव झाला तर संपली WTCची आशा? मोठं समीकरण उघड!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केवळ तीन दिवसांत पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडिया आता गुवाहाटीतल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. एका मागोमाग दोन सामन्यातील खराब कामगिरीमुळे मालिकेचं पारडं दक्षिण आफ्रिकेकडे झुकताना दिसत आहे.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात भारताचा डाव केवळ 201 धावांवर कोसळला आणि पाहुण्या संघाने 288 धावांची प्रचंड आघाडी मिळवली. तिसऱ्या दिवसाखेरीस आफ्रिकन फलंदाजांनी एकही विकेट न गमावता आघाडी 300 च्या पुढे नेली आहे. त्यामुळे सामना भारतासाठी अत्यंत कठीण स्थितीत पोहोचला आहे.

या सामन्यात पराभव झाला तर न्यूझीलंडनंतर भारताला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धही मालिका गमवावी लागेल. मालिकेच्या दृष्टीने हा सामना ‘करो या मरो’ अशा स्वरूपाचा झाला आहे. पुढील दिवसातील खेळ भारतीय संघाच्या एकूण मोहीमेचं चित्र बदलू शकतो.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया 100 टक्के विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 66.67 टक्के गुणांसह दुसऱ्या, तर श्रीलंका 66.68 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी आहे. भारत सध्या 54.17 टक्के विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानी आहे.

गुवाहाटीत भारताचा पराभव झाल्यास ही टक्केवारी 48.14 वर घसरू शकते. भारताच्या घसरणीचा थेट फायदा पाकिस्तानला होईल आणि ते चौथ्या स्थानावर झेपावतील. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेची विजयी टक्केवारी 75 वर पोहोचत त्यांची स्थिती अधिक मजबूत बनेल.

गुवाहाटी येथे पराभव झाला तरी भारताची WTC फायनलची स्वप्ने पूर्णपणे कोसळत नाहीत. या साखळीत टीम इंडियाला अजून 9 सामने खेळायचे आहेत. पुढील सर्व सामने गमावण्याची भारताची परवड नाही. उरलेल्या 9 पैकी 8 सामने जिंकण्यात भारत यशस्वी ठरल्यास विजयी टक्केवारी 70 च्या वर जाईल, जी फायनल खेळणाऱ्या संघांच्या पारंपरिक टक्केवारीपेक्षा अधिक आहे.

म्हणजेच गुवाहाटीतील पराभव भारतासाठी मोठा धक्का ठरेल, पण WTC फायनलची दारे अजूनही बंद झाली नाहीत. मात्र पुढील प्रत्येक सामना भारताला ‘नॉकआउट’सारखा खेळावा लागणार आहे.

Comments are closed.