IND Vs SL 2nd Test – मैदानात राडा अन् थेट ICC चा दणका; यशस्वी जयस्वालसह असिथा फर्नांडोवर कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोलंबो कसोटीमध्ये पहिल्याच दिवशी यशस्वी जयस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो मैदानात भिडले होते. दोघांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत दोन्ही खेळाडूंना बाजूला केलं होतं. आता ICC ने याप्रकरणाची दखल घेत दोन्ही खेळाडूंवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो या दोघांनाही त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला असून दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 1 डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.12 चे उल्लंघन केल्याप्रकरणी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे कलम खेळाडू किंवा पंचांसोबत अयोग्य शारीरिक संपर्काशी संबंधित आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागिल 24 महिन्यांत दोघांच्यावरही कोणत्याही प्रकारचा दंड ठोठावण्यात आला नव्हता. तसेच त्यांनी आपली चूक कबूल केल्यामुळे त्यांच्यावर पुढील सामने खेळण्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.

पहिल्या डावातील 17 व्या षटकात असिथा फर्नांडोने यशस्वी जयस्वालला 45 धावांवर (53 चेंडू, 9 चौकार) बाद केले. बाद झाल्यानंतर जयस्वाल फर्नांडोच्या दिशेने गेले आणि दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. यादरम्यान फर्नांडोने आपले डोके जयस्वालच्या दिशेने सरकवले आणि त्याच वेळी जयस्वाल खाली झुकल्याने दोघांचे डोके एकमेकांना लागले. अखेरीस पंचांनी तातडीने धाव घेत दोघांना वेगळे केले. या मालिकेमध्ये यशस्वी जयस्वालला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावांत (32 आणि 0) स्वस्तात बाद झाल्यानंतर, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही त्याला 45 धावांवर बाद व्हावे लागले.

Comments are closed.