मोठं स्टेडियम, पण वातावरण थंड! नरेंद्र मोदी स्टेडियमच्या रिकाम्या खुर्च्या, कारण काय? BCCI च्या


Ind vs Wi प्रथम रिक्त स्टँड अहमदाबाद: आशिया कपमध्ये पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष अजूनही ओसरलेला नव्हता की भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाली. नरेंद्र मोदी स्टेडियम त्याच्या प्रचंड क्षमतेसाठी आणि आधुनिक सोयीसुविधांसाठी ओळखले जाते. पण यावेळी ते चर्चेत आलं ते खेळाच्या दर्जामुळे नाही, तर रिकाम्या खुर्च्यामुळे. मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रिकाम्या खुर्च्या पाहून चाहत्यांसह तज्ज्ञही अचंबित झाले.

नरेंद्र मोदी स्टेडियमच्या रिकाम्या खुर्च्या, कारण काय?

सामन्याच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण संपूर्ण संघ अवघ्या 162 धावांत गारद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करत चार गडी बाद केले, तर जसप्रीत बुमराहने तीन, कुलदीप यादवने दोन आणि वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला. भारतीय गोलंदाजांनी सामन्याला धार दिली खरी, पण रिकाम्या खुर्च्यामुळे त्या कसोटीचा रोमांच फिका पडला.

सोशल मीडियावर चाहत्यांनी आपली नाराजी जोरदार व्यक्त केली. अनेकांचा सूर असा होता की, कमी दर्जाच्या संघाविरुद्ध इतक्या मोठ्या मैदानाचा वापर करणे योग्य नाही. एका चाहत्याने ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, ‘जर कमी दर्जाच्या संघाविरुद्ध सामना घ्यायचाच होता, तर कसोटीला प्रेक्षक खेचतील अशा लोकप्रिय मैदानाचा वापर करायला हवा होता. अहमदाबाद मोठं आहे, पण कसोटी सामन्यांसाठी ते योग्य नाही. ते फक्त टी-20 किंवा मोठ्या लीग सामन्यांसाठीच वापरायला हवं.”

या मुद्यावर माजी कर्णधार विराट कोहलीने 2019 मध्येच आपले मत व्यक्त केले होते. त्याच्या मते, भारतात फक्त पाच निश्चित कसोटी केंद्रे असावीत. त्यामुळे परदेशी संघांनाही ठराविक जागा, पिच आणि वातावरण याची तयारी करता येईल. राज्य संघटनांच्या रोटेशन धोरणामुळे अनेक मैदानांवर सामने होतात, पण स्थळे ठरवल्यास कसोटी क्रिकेटचा दर्जा आणि लोकप्रियता दोन्ही वाढतील, असे त्याचे मत होते.

21व्या शतकात बीसीसीआयने भारतात तब्बल 18 वेगवेगळ्या स्टेडियमवर कसोटी सामने घेतले आहेत. याउलट इंग्लंडने केवळ 9 आणि ऑस्ट्रेलियाने 10 स्टेडियमपुरती मर्यादा ठेवली आहे. तज्ज्ञांच्या मते, कसोटी क्रिकेटची प्रतिष्ठा आणि प्रेक्षकांचा सहभाग टिकवण्यासाठी भारतानेही काही निश्चित केंद्रे निश्चित करणे आवश्यक आहे. शेवटी, हा वाद केवळ रिकाम्या खुर्च्याचा नाही, तर भारतात कसोटी क्रिकेट कुठे आणि कशा पद्धतीने खेळवायचे, यावर नव्याने विचार करण्याची वेळ आहे. जेणेकरून खेळाचा मानमरातबही वाढेल आणि चाहते सामना पाहण्यासाठी येतील.

हे ही वाचा –

Mirabai Chanu News : मीराबाई चानूने पुन्हा गाजवला विश्वविजयाचा डंका, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून भारताचा झेंडा उंचावला

आणखी वाचा

Comments are closed.