INDvsWI: सिराजला बाकावर बसल्याचा फटका! जॉन कॅम्पबेल-जस्टिन ग्रीव्ह्ज जोडीने रचला इतिहास, 16 वर्षांनंतर विंडीजच्या ओपनर्स…

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज बहुप्रतीक्षीत एकदिवसीय मालिकेला रविवारी (27 सप्टेंबर) सुरूवात झाली. दोन्ही संघामध्ये तिरुअनंतपुरमध्ये पहिला सामना सुरू आहे. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम अकरामध्ये अनेक मोठे बदल दिसले. मोहम्मद सिराजला बाकावर बसवले, तर नमन धीरने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. सिराजला बाकावर बसवणे भारताला चांगलेच नुकसानदायक ठरताना दिसले, कारण विंडीजच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी करत विक्रम केले आहेत.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचे सलामीवीर जॉन कॅम्पबेल आणि जस्टिन ग्रीव्ह्ज यांनी संघाला अप्रतिम सुरूवात करून दिली. दोघांनी उत्तम शॉट्स खेळत 19.2 षटकांत 135 धावा करत 16 वर्षांचा दुष्काळ संपवला. 2009 नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या दोन्ही सलामीवीरांनी भारताविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्या. जॉन-जस्टिन यांच्याआधी ख्रिस गेल आणि रुनको मोर्टन यांनी भारताविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
तसेच जॉन-जस्टिन यांची भागीदारी भारताविरुद्ध भारतात वेस्ट इंडिजची एकदिवसीय मालिकेच्या इतिहासातील आतापर्यंतची तिसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. दिग्गज गार्डन ग्रीनिज आणि फिल सिमन्स यांच्या नावावर भारताविरुद्ध भारतात सर्वात मोठी एकदिवसीय भागीदारी आहे. त्यांनी 1988 मध्ये 164 धावांची भागीदारी केली होती. दुसऱ्या स्थानावर 1983 मधील 149 धावांच्या भागीदारीचा क्रमांक लागतो, जी ग्रीनिज यांनी डेसमंड हेंस यांनी मिळून केली होती.
जॉन-जस्टिन जोडीला कुलदीप यादवने तोडले. भारतीय फिरकीपटूने वेस्ट इंडिजच्या डावाच्या 20 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जॉनला 62 धावांवर प्रसिद्ध कृष्णाकरवी झेलबाद केले.
Comments are closed.