IND Vs WI – नरेंद्र मोदी स्टेडियम कसोटीसाठी उपयुक्त नाही, चाहत्यांचा रोष

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उभय संघांमध्ये सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजच्या बत्त्या गुल केल्या आहेत. मात्र, टीम इंडियाचा हा बेधडक अंदाज पाहण्यासाठी चाहतेच नसल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. कसोटी सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम उपयुक्त नसल्याचं म्हणत चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु घेतलेल्या निर्णयावर फलंदाजांनीच पाणी फेरलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे वेस्ट इंडिजचे फलंदाजांचा निभाव लागला नाही. हजेरी लावून खेळाडू तंबूत परतले. मोहम्मद शामीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने 3, कुलदीप यादवने 2 आणि वॉशिंगटन सुंदरने 1 विकेट घेतली. त्यामुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावांमध्येच संपुष्टात आला. परंतु टीम इंडियाची ही धारधार गोलंदाजी पाहण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियम चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर एका चाहत्याने ट्वीट करत अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम कसोटी सामन्यासाठी उपयुक्त नसल्याच म्हटलं आहे.

त्याने ट्वीट करत म्हटलं की, जर आपण एखाद्या खालच्या दर्जाच्या संघाविरुद्ध कसोटी खेळणार असू, तर आपल्याला कसोटी सामन्यासाठी लोकप्रीय आणि गर्दी असलेले स्टेडियम निवडायला हवे होते. अहमदाबादमध्ये मोठ्या क्षमतेचे स्टेडियम आहे, परंतु ते कसोटी सामन्यांसाठी योग्य नाही. ते फक्त टी-20 सामने किंवा प्रमुख लीग सामन्यांसाठी राखीव ठेवले पाहिजे.” असं त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ सुरू असून टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात 2 गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा केल्या आहेत. 38 षटकांचा खेळ झाला असून केएल राहुल (53) आणि शुभमन गिल (18) सध्या फलंदाजी करत आहेत. यशस्वी जयसवाल (36) आणि साई सुदर्शन (07) स्वस्तात माघारी परतले.

Comments are closed.