IND vs WI – विंडीजचा खेळ खल्लास! हिंदुस्थानचा डाव अन् 140 धावांनी महाविजय, जाडेजाची अष्टपैलू चमक

रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद सिराज यांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर ‘टीम इंडिया’ने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडीजचा अवघ्या अडीच दिवसांत खेळ खल्लास करीत डावाने आणि 140 धावांनी पराभव करीत महाविजय साजरा केला. पहिल्या डावात नाबाद 104 धावांची शतकी खेळी केली आणि त्यानंतर 4 बळी टिपत जाडेजाने आपल्या सर्वांगीण क्षमतेची पुन्हा एकदा झलक दाखविली. सिराजने दोन्ही डावांत मिळून सात बळी घेत विंडीजची दाणादाण उडविली.

वेस्ट इंडीजला 162 धावांवर रोखल्यानंतर हिंदुस्थानने 5 बाद 448 धावसंख्येवर डाव घोषित करून पहिल्या डावात 286 धावांची मोठी आघाडी घेतली होती. यात सलामीवीर लोकेश राहुलने 100, यष्टिरक्षक ध्रुव जुरेलने 125 धावांची जबरदस्त खेळी केली, तर जाडेजाने नाबाद 104 धावा झळकावल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा दुसरा डाव 45.1 षटकांत 146 धावांत संपुष्टात आला. सिराजने पहिल्या डावात 40 धावांत 4, तर दुसऱया डावात 31 धावांत 3 बळी टिपले. जसप्रीत बुमराने पहिल्या डावात 42 धावांत 3 फलंदाज बाद केले, तर जाडेजाने दुसऱया डावात 54 धावांत 4 बळी घेतले. कुलदीप यादवने दुसऱया डावांत 2, तर वॉशिंग्टन सुंदरने एक फलंदाज बाद केला. यजमान हिंदुस्थानने या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

12 वर्षांचा विक्रम मोडीत

2013 च्या फेब्रुवारीपासून ‘टीम इंडिया’ने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. मात्र 2024 मध्ये न्यूझीलंडने हिंदुस्थानात येऊन ‘टीम इंडिया’चा हा विजयरथ रोखला होता. आता नव्या हंगामात वेस्ट इंडीजविरुद्ध रवींद्र जाडेजाने पुन्हा संघाला विजयाच्या मार्गावर आणले. विराट कोहली, रविचंद्रन आश्विन आणि चेतेश्वर पुजारा हे धुरंधर खेळाडू निवृत्त झाल्यानंतरही जाडेजा अजूनही हिंदुस्थानी संघाचा आधारस्तंभ आहे. 36 वर्षीय जाडेजाने आश्विनशिवाय खेळल्या जाणाऱया या मालिकेच्या पहिल्या कसोटीतच शतक झळकाविले आणि चार बळी टिपत आपले अष्टपैलुत्व पुन्हा सिद्ध केले.

77 वर्षांनंतर हिंदुस्थान-विंडीज बरोबरी

हिंदुस्थानी संघाने तब्बल 77 वर्षांनंतर वेस्ट इंडीजला मायदेशात कसोटी सामन्यांतील जय-पराजयाचे पारडे समान केले. कारण या मालिकेच्या आधी वेस्ट इंडीज हा एकमेव असा संघ होता की, त्यांचे हिंदुस्थानातील कसोटी विजय पराभवापेक्षा अधिक होते. मात्र अहमदाबाद कसोटीतल्या डावाने विजयाने आता जय-पराजयाचे पारडे समान 14-14 झाले आहे.

Comments are closed.