क्रिकेटनामा – यशस्वी हुकमत

>> संजय करहाडे
डावरी लय किती मनमोहक असू शकते! काल यशस्वीचा सूर आपल्याला प्रत्यय देऊन गेला. त्याचं हे सातवं शतक एखाद्या चित्रासारखं होतं. ग्रीव्हज् आणि फिलिपला लगावलेले सरळ ड्राईव्हज् मास्टर स्ट्रोक्स होते. अन् बाकीचे वीस चौकार लुभावणे रंगभरे! काही कटचे, काही पुलचे, कव्हर ड्राइव्हचे आणि काही त्याची स्वतःची आगळी प्रतिभा दाखवणारे… यशस्वीच्या खेळण्यात शांतता होती, खात्री होती. शतक साजरं करण्यात हक्काची नाटकियता!
एका डावऱ्याचा साक्षीदार दुसरा डावरा. साई सुदर्शन! इंग्लंडच्या दौऱ्यापासून साईकडे सगळय़ांच्या नजरा होत्या. यशस्वी अन् साई दोघंही तेवीस वर्षांचे. दोघांची तुलना मात्र नको. आज साई जे दडपण सोसतोय तेच दडपण यशस्वीने आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच विंडीजविरुद्धच्या कसोटीत 171 धावांची खेळी करताना झटपून टाकलेलं होतं; पण 58 धावांवर एका आळशी फ्लिकवर मिळालेलं जीवदान त्याला फारसं लाभलं नाही. राहुलला फसवणारा वॉरीकनचा उंची दिलेला चेंडू जेवढा अन् जसा वळला तशाच चेंडूवर साई फसला. राहुल यष्टिचीत तर साई पायचीत झाला. साईचे कट, ड्राईव्हज्, फ्लिक्स छान होते. पण कारकिर्दीतली तो पहिलीच मोठी खेळी खेळत होता. अशा वेळी सर्वसाधारणपणे बॅटवर असणारी पकड घट्ट असते. ती लवकर सैल होवो अन् त्याच्या खेळी अधिक नजाकतभऱ्या घडोत हीच इच्छा!
कप्तान गिलचा आत्मविश्वास मला आवडला. आज त्याच्याकडून शतकाची अपेक्षा ठेवायला हरकत नाही! या सामन्यातलं शतक आणि विजय त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अधिक शाश्वती देईल. रो-कोच्या संघातल्या समावेशामुळे डोक्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य गदारोळाला शांत करील. संघावर अधिक नियंत्रण मिळवून देईल. या अनुषंगाने संबंधित सर्वांनाच माझ्या मनापासून शुभेच्छा!
विंडीजबद्दल काय बोलायचं! एक वॉरिकन सोडला तर विंडीजचे गोलंदाज, क्षेत्ररक्षक थोडे ढिलेच वाटले. त्यांची चाल चार दिवसांवर निवृत्ती आलेली असताना ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यासारखी होती. समर्पित. डोळय़ात जणू नजरच नसावी!
पहिल्याच दिवशी तीनशेपार गेलेली आपली धावसंख्या आज पाचशेपार जायला फार वेळ लागू नये. त्यानंतर मात्र विंडीज फलंदाजांना एकाग्रतेचा, निश्चयाचा आणि निग्रहाचा महामेरू उभारावा लागेल. डावऱ्या वॉरीकनला ज्या खेळपट्टीने पहिल्याच दिवशी साथ दिली तीच खेळपट्टी जडेजाला दुसऱ्या दिवशी कशी खांद्यावर घेऊन मिरवेल हे सांगणे न लगे!
Comments are closed.