IND Vs WI – वेस्ट इंडिजला हिंदुस्थानात कसोटी विजयाचा दुष्काळ संपवण्याची संधी, 31 वर्षांपूर्वी मोठ्या फरकाने टीम इंडियाचा केला होता पराभव

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि एक डाव राखून 140 धावांनी सामना जिंकला. त्यामुळे 1-0 अशी आघाडी टीम इंडियाने घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी वेस्ट इंडिजला आहे. एक काळ होता जेव्हा वेस्ट इंडिजचा क्रिकेट विश्वावर दबदबा होता. परंतू काळ बदलला आणि वेस्ट इंडिजला मागील 31 वर्षांत हिंदुस्थानात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही.
वेस्ट इंडिजने 1994 साली हिंदुस्थानात कसोटी सामना जिंकला होता. कर्णधार कर्टनी वॉल्शच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 243 धावांनी पराभव केला होता. मात्र, त्यानंतर आजपर्यंत वेस्ट इंडिजला हिंदुस्थानात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. 1994 साली मोहालीमध्ये कसोटी सामना खेळला गेला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेकीसह सामनाही जिंकला होता. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 443 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा पहिला डाव 387 धावांमध्ये संपुष्टात आला. 56 धावांची आघाडी घेत वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 301 धावांवर आपला डाव घोषित केला. त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 357 धावांच आव्हान मिळालं होतं. परंतु आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली आणि संपूर्ण संघ 114 धावांमध्येच बाद झाला. वेस्ट इंडिजने 243 धावांनी सामना आपल्या नावावर केला. यावेळी मोहम्मद अझरुद्दीन हा टीम इंडियाचा कर्णधार होता.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे टीम इंडिया दुसऱ्या सामन्यावर कब्जा करून मालिका खिशात घालण्याच्या तयारीतच मैदानात उतरेल. तर वेस्ट इंडिज सामना जिंकून मालिका बरोबरी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Comments are closed.