IND vs WI: 7 शतकं, 7 मैदानं… प्रतिस्पर्ध्यांसाठी “काळ” ठरत आहे यशस्वी जयस्वाल!

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये मोठी खेळी करण्याची संधी हुकवल्यानंतर, युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल दुसऱ्या कसोटीमध्ये ती चूक पुन्हा होऊ देण्याच्या मूडमध्ये नाहीये. दिल्लीतील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर यशस्वीने जबरदस्त संयम आणि कौशल्य दाखवत 253 चेंडूंमध्ये 22 चौकारांच्या मदतीने नाबाद 173 धावांची अफलातून खेळी केली. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवी शतकी खेळी ठरली.

खास बाब म्हणजे यशस्वीचे हे सातही शतकं वेगवेगळ्या मैदानांवर आली आहेत. एक असा दुर्मिळ विक्रम जो केवळ सातत्याच नव्हे तर विविध परिस्थितींमध्ये फलंदाजी करण्याच्या क्षमतेचं प्रतीक मानलं जात आहे. 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध डोमिनिका येथे रोसो मैदानावर 171 धावा करत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या यशस्वीने त्या खेळीनंतर मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या प्रत्येक शतकाने सामन्याचा कल बदलला असून, भारतीय संघाला निर्णायक क्षणी स्थिरता आणि आघाडी मिळवून दिली आहे.

इंग्लंडविरुद्ध राजकोट आणि विशाखापट्टणममध्ये अनुक्रमे 214* आणि 209* अशी नाबाद द्विशतकं झळकावत यशस्वीने मोठ्या खेळींची सवय लावल्याचं दाखवलं. पर्थसारख्या वेगवान आणि उंच उसळणाऱ्या खेळपट्टीवर 161 धावांची खेळी करत त्याने परदेशातील कठीण परिस्थितीतही आपली ताकद सिद्ध केली. दिल्लीतील त्याची ताजी शतकी खेळी फक्त व्यक्तिगत यश नसून, भारताच्या डावाला भक्कम पाया देणारी ठरली आहे.

यशस्वीच्या खेळात एक खास गोष्ट म्हणजे तो फक्त धावा करत नाही, तर सामन्याची स्थिती ओळखून त्यानुसार आपली गती आणि शैली बदलतो. कधी संयमाने खेळतो, तर कधी आक्रमक फटकेबाजी करत दबदबा निर्माण करतो. दिल्लीतील या खेळीत त्याने कवर ड्राईव्ह, पुल शॉट्स आणि कट शॉट्सच्या माध्यमातून फलंदाजीचा एक उत्कृष्ट क्लास दाखवला.

यशस्वी जयस्वाल फक्त एक युवा खेळाडू न राहता भारतीय संघाचा विश्वासार्ह टॉप ऑर्डर फलंदाज बनला आहे. सात वेगवेगळ्या मैदानांवर सात शतकं झळकावणारा हा डावखुरा फलंदाज भारतीय क्रिकेटसाठी दीर्घकालीन संपत्ती ठरणार हे निश्चित.

Comments are closed.