भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना फ्रीमध्ये कसा पाहाल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये २६ फेब्रुवारी रोजी भारतीय संघासमोर ‘करा किंवा मरा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुपर-८ फेरीतील पुढील सामन्यात भारताचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. या टप्प्यावर पराभव झाल्यास स्पर्धेबाहेर पडण्याचा धोका असल्याने हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील सामन्यात भारताला ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या विश्वचषकातील ती भारताची पहिली हार होती. त्यामुळे उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी झिम्बाब्वेविरुद्ध विजय अनिवार्य झाला आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम मैदानावर खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर झिम्बाब्वे संघाची धुरा सिकंदर रझा याच्या खांद्यावर असेल. झिम्बाब्वेलाही सुपर-८ फेरीतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आणि निर्णायक ठरणार आहे.
प्रसारणाबाबत बोलायचे झाल्यास, या सामन्याचे थेट दूरदर्शन प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येईल. मात्र ही सशुल्क वाहिनी असल्याने सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना सदस्यत्व आवश्यक असेल. मोबाईलवर थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार या APPवर उपलब्ध असेल.
याशिवाय डीडी स्पोर्ट्स या वाहिनीवरही सामन्याचे थेट प्रसारण केले जाणार आहे. ज्यांच्या घरी फ्री डिश दूरचित्रवाणी आहे, त्यांना हा सामना विनामूल्य पाहता येईल.
उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष आता या महत्त्वाच्या लढतीकडे लागले आहे.
Comments are closed.