T20 WC26: रिंकू सिंग लवकरच परतणार टीम इंडियामध्ये, फलंदाजी प्रशिक्षकांनीच केले स्पष्ट

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या मध्येच भारतीय संघाचा एक खेळाडू घरी परतला होता. काही वैयक्तिक कारणामुळे रिंकू सिंग घरी गेला होता. आता तो लवकरच संघाशी जोडला जाणार आहे, असे भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी सांगितले आहे. सध्या भारतीय संघात झिम्बाब्वेच्या सामन्यासाठी संजू सॅमसन येणार की नाही याच्या चर्चा सुरू असताना रिंकूच्या घरी जाण्याने त्याला वेग आला.
रिंकूच्या वडिलांची तब्येत खराब झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यामुळे रिंकू ताबडतोब घरी गेला होता. त्यानंतर तो झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याला मुकणार अशा चर्चा सुरू झाल्या. तसेच तो संघात कधी परतणार? या सर्वांची उत्तरे कोटक यांनी बुधवारी (२५ फेब्रुवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहेत.
कोटक म्हणाले, ” रिंकू चेन्नईमध्ये परतणार असून लवकरच संघाशी जोडला जाणार आहे. त्याच्या वडिलांची तब्येत ठिक नसल्याने तो घरी गेला होता.”
रिंकूच्या घरी जाण्याने आणि भारतीय फलंदाजांच्या सध्याच्या फॉर्ममुळे भारताच्या अंतिम अकरामध्ये संजूला घेण्याबाबतच्या चर्चेला वेग आला आहे. तसेच झिम्बाब्वेविरुद्ध रिंकू खेळणार की नाही हे अजून निश्चित नाही. त्याने या स्पर्धेत क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी केली आहे, मात्र फलंदाजीत तो अपयशी ठरत आहे. त्याच्याकडून जशी फिनिशरची अपेक्षा आहे, त्यामध्ये तो कमी पडत आहे.
या स्पर्धेत भारताचा पुढील सुपर-८चा सामना झिम्बाब्वेविरुद्ध उद्या म्हणजे २६ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. पहिला सामना गमावल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. हा सामना गमावल्यास भारताच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या अडचणीत आणखी वाढ होईल.
Comments are closed.