IND vs ZIM, T20 Mens World Cup: रुळावर आलो!
IND vs ZIM, T20 पुरुष विश्वचषक: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये घसरलेली सूर्यकुमारच्या (Suryakumar Yadav) भारतीय ब्रिगेडची गाडी चेन्नईच्या मैदानात रुळावर आली. अर्थात समोर झिम्बाब्वेसारखा तुलनेने अनुभवी आणि कमी ताकदीच्या गोलंदाजीचा संघ होता. तरीही याच झिम्बाब्वेने ऑसी आणि श्रीलंकेला धूळ चारली होती हे विसरता कामा नये. म्हणूनच भारताच्या विजयाचं मोल कमी होत नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर एट मॅचमध्ये चारी मुंड्या चीत झालेल्या भारताला मोठ्या विजयाच्या ऑक्सिजनची आवश्यकता होती. त्यात आज आधी झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने विंडिजला धुतल्याने आपल्याला मोकळा श्वास घेणं आणखी सोपं झालं. अन्यथा विंडिज जिंकली असली तर नेट रनरेटमध्ये सरस असलेले दोन संघ आपल्यापुढे गेले असते. आता विंडिजविरुद्ध नुसता विजयदेखील पुरेसा आहे. नेट रनरेटचं कोणतंही दडपण नाहीये. हे चांगलं झालं. आजच्या मॅचकडे पुन्हा येऊया. संघात केलेले बदल उपयुक्त ठरले. सॅमसन टीमध्ये आल्याने सलामीला डावखुरी-उजवी जोडी उतरली, त्यात अक्षर पटेलही परतल्याने वाढलेली संघाची दोन्हींमध्ये वाढलेली ताकद याचा परिणाम जाणवला. झिम्बाब्वेची गोलंदाजी आपण फोडून काढली.
3.4 षटकांत 48 ची वादळी सलामी आपल्याला मिळाली. या भक्कम पायावर आपल्या धावांचा बुर्ज खलिफा उभा राहिला. धावांचा सेल लागलेला, त्या सर्वांनीच मनसोक्त लुटल्या. तिलक वर्माने तर झिम्बाब्वेच्या गोलंदाजीची कत्तल केली. 257चं टार्गेट झिम्बाब्वेसाठी डोंगराएवढं होतं. ते झिम्बाब्वेला पेलवणंही कठीण होतं. तरीही सलामीवीर बेनेटने दिलेली फाईट कौतुकास्पद ठरली. दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने विकेट्स गेल्याने दुसऱ्या सत्रात कोणत्याही क्षणी झिम्बाब्वे या लक्ष्याच्या पाठलाग करतेय असं जाणवलं नाही. अर्शदीपने तीन विकेट्स घेतल्या. तर बुमरा, हार्दिकने खडूस गोलंदाजी केली. बेनेटच्या फटकेबाजीमुळे झिम्बाब्वे 184 पर्यंत पोहोचली. आपली पुढची मॅच विंडिजसोबत आहे. विंडिज जरी द. आफ्रिकेविरुद्ध मोठ्या फरकाने हरली असली तरी त्यांच्याकडे असलेली फलंदाजांची ताकद आणि खोली त्यांनी दाखवून दिलीय. म्हणजे 83 ला 7 या केविलवाण्या स्थितीतून त्यांनी 176 चा आव्हानात्मक टप्पा गाठला. होल्डर आणि शेफर्डनी विंडिजचा टिपिकल ‘पॉवर प्ले’ दाखवला.
टोलेजंग षटकार ठोकत चेंडूला स्टेडियमची सहल घडवून आणली. दक्षिण आफ्रिका टीमने सामन्यावर वर्चस्व पटकावल्यावर या जोडीने कमबॅक केलं. ही बाब भारताला लक्षात घ्यावी लागेल. एखादी धोकादायक पार्टनरशिप आपलं सामन्यातलं आणि पर्यायाने स्पर्धेतलं स्थान धोक्यात आणू शकते. भारत-विंडिज सामना आता उपांत्यपूर्व फेरीची लढत झालीय. जो जिंकेल तो आगेकूच करेल. तो संघ भारतच असावा, अशी अपेक्षा सारेच भारतीय क्रिकेटरसिक करतायत. गाडी रुळावर आलीय. आता सेमी फायनलच्या दिशेने दौडण्यासाठी आणखी एका खणखणीत परफॉर्मन्सची आवश्यकता आहे.
Comments are closed.