IND W Vs AUS W – गोलंदाजांची कमाल; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव केला, मालिका बरोबरीत

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 293 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 190 धावांमध्येच बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाने 102 धावांनी मोठा विजय साजरा करत मालिका 1-1 अशी बरोबर केली आहे.
प्रथम फलंदाजी करताना उपकर्णधार स्मृती मानधनाने 117 धावांची तुफान खळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 292 धावांपर्यंज मजल मारण्यात यश आलं. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. क्रांती गौड आणि रेणुका सिंगने ऑस्ट्रेलियाला दोन मोठे हादरे देत सलामीची जोडी फोडून काढली. त्यानंतर एलिस पॅरी (44) आणि अॅनाबेल सदरलँड (45) यांनी मधल्या फळीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या फार काळ मैदानावार टिकू शकल्या नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 40.5 षटकांमध्ये 190 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियाकडून क्रांती गौडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तिला इतर गोलंदाजांची चांगली साथ मिळाली. दिप्ती शर्माने 2 विकेट घेतल्या. तर रेणुका सिंग, स्नेह राणा, अरुंदती रेड्डी आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला. दोन्ही संघांमध्ये मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आता 20 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Comments are closed.