IND W vs AUS W: विजयाच्या क्षणी रडल्या जेमिमा,हरमनच्याही डोळ्यांत अश्रू; भावनांनी भरलेलं मैदान!
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला वनडे वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात भारताने सात वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सनी हरवत अंतिम फेरीत धडक मारली. 48.3 षटकांत अमनजोत कौरने चौकार ठोकत भारताचा विजय निश्चित केला, मात्र या ऐतिहासिक यशाची खरी सूत्रधार ठरली ‘लोकल गर्ल’ जेमिमा रॉड्रिग्ज. तिच्या 134 चेंडूत 127 नाबाद धावांच्या खेळीने भारताला विजयाचा मार्ग दाखवला.
विजयानंतर मैदानावर जेमिमाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. हे दुःखाचे नव्हे, तर विजयाचे आणि संघर्षाचे अश्रू होते. देशभरातील चाहतेही भावूक झाले, कारण या अश्रूंमध्ये वर्षभराच्या परिश्रमाचे, टीकेचे आणि स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याचे समाधान होते.
जेमिमाची खेळी केवळ शब्दात किंवा आकड्यांत मांडता किंवा मोजता येत नाही. तिने धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाने खेळ रचला. शतक पूर्ण झाल्यानंतरही तिने सेलिब्रेशन न करता शांतपणे बॅट उचलली, कारण तिला ठाऊक होतं की अजून काम बाकी आहे, भारताला विजय मिळवायचा आहे.
दुसरीकडे, कर्णधार हरमनप्रीत कौरही भावनांनी ओथंबली. ती 88 चेंडूत 89 धावा करून बाद झाली आणि नॉकआउट सामन्यातील सलग तिसरे अर्धशतक झळकावले. विजय क्षणात हरमनने जेमिमाला मिठी मारून अश्रूंनी ओले डोळे लपवले.
जेमिमा आणि हरमन यांच्यातील 167 धावांची ऐतिहासिक भागीदारी भारतासाठी निर्णायक ठरली. सात वेळची विश्वविजेती ऑस्ट्रेलिया 2022 पासून एकही सामना हरली नव्हती. पण या भारतीय जोडीने त्यांचा ‘अजेय रथ’ थांबवला.
ऑस्ट्रेलियन फिल्डर्सनी काही सोपे झेल सोडले आणि त्याचा फायदा भारतीय फलंदाजांनी घेतला. आणि त्याचा फायदा भारतीय संघाने घेतला आणि ऐतिहासिक विजय मिळवला.
आता 2 नोव्हेंबरला अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
 
			 
											
Comments are closed.