पंत फेल, पण आयुष चमकला

दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध सुरू असलेल्या अनौपचारिक कसोटी मालिकेत हिंदुस्थानचा डाव जणू पावसातले फुस्स फटाके ठरला. थोडा फसफुसला आणि पटकन विझला. पंतच्या नेतृत्वाखालील संघाला पाहुण्यांनी 234 धावांत रोखत पहिल्या डावात तब्बल 75 धावांची आघाडी घेतली. इंग्लंड दौऱ्यात झालेल्या गंभीर दुखापतीनंतर ऋषभ पंतचे मैदानावर परतणे हीच मोठी बातमी होती. चाहत्यांच्या मनात एकच अपेक्षा होती, पंत परतला म्हणजे फटकेबाजीचा तडाखाही परतणार. पण प्रत्यक्षात त्याच्या बॅटला सूर सापडला नाही. अवघ्या 17 धावांवर तो बाद झाला आणि त्याच्या पुनरागमनाचा जल्लोष क्षणात शांत झाला. फॉर्म हरवलेला नाही, पण टायमिंग अजून रुग्णालयातच असल्यासारखे वाटले.

दुसरीकडे मुंबईचा युवा आयुष म्हात्रे मात्र चांगलाच चमकला. 76 चेंडूंत 65 धावांची झळाळती खेळी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या फटक्यांमध्ये नजाकत होती, आत्मविश्वासाचा ठसा होता. या नवख्या चेहऱ्यात एक वेगळा निर्धार आणि खेळातील ताजेपणा दिसला. साई सुदर्शनने 94 चेंडूंत 32 धावा केल्या. सुरुवात छान झाली होती, पण शेवट गडबडीत झाला. आयुष बदोनीने 47 चेंडूंत 38 धावा करत थोडा दिलासा दिला, पण पुढे कोणी साथ देऊ शकले नाही. रजत पाटीदारने 19 तर देवदत्त पडिक्कलने केवळ 6 धावा केल्या. हिंदुस्थानचा पहिला डाव 234 धावांवर आटोपला, तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 309 धावा करत आधीच पकड मजबूत केली होती. दुसऱ्या दिवसअखेर पाहुण्यांनी दुसऱ्या डावात बिनबाद 30 धावा करत 105 धावांची एकूण आघाडी घेतली.

Comments are closed.