भारताच्या लेकींनी करून दाखवलं, श्रीलंकेला हरवून फायनलमध्ये थाटात एन्ट्री! पाकिस्तानविरुद्ध हायव
India defeat Sri Lanka Asia Cup Rising Stars 2026 : थायलंडमधील बँकॉक येथे सध्या महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेचे सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेत भारतीय महिला ‘अ’ संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंका महिला ‘अ’ संघाशी झाला आणि हा सामना भारताने एकतर्फी अंदाजात जिंकत आपली ताकद दाखवून दिली. भारताने हा सामना 5 विकेट्सनी जिंकला.
गोलंदाजांची भेदक कामगिरी
उपांत्य सामन्यात श्रीलंका ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांना धावा करणे कठीण गेले. संपूर्ण संघ 19.4 षटकांत अवघ्या 118 धावांत गारद झाला. श्रीलंकेकडून संजना कविंदीने 35 चेंडूत 31 धावांची झुंजार खेळी केली, तर शशिनी गिम्हानीने 17 चेंडूत 22 धावा केल्या. हंसिमा करुणारत्ने (14) आणि सथ्या संदीपनी (15) यांनीही थोडेफार योगदान दिले.
भारतीय गोलंदाजांमध्ये कर्णधार राधा यादव हिने 3.4 षटकांत 19 धावा देत 4 विकेट घेत श्रीलंकेचा डाव अक्षरशः उद्ध्वस्त केला. प्रेमा रावत हिने 4 षटकांत केवळ 9 धावा देत 2 बळी टिपले, तर तनुजा कंवर हिनेही 2 गडी बाद करत मोलाची साथ दिली.
फायनल गाठली! 🇮🇳
भारत अ संघाने श्रीलंका अ संघावर ५ गडी राखून विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला! #WomensRisingStarsAsiaCup pic.twitter.com/NvlxFTMq7b
— BCCI महिला (@BCCIWomen) 20 फेब्रुवारी 2026
वृंदा दिनेशची पुन्हा एकदा तुफानी खेळी
119 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. 30 धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर वृंदा दिनेश आणि अनुष्का शर्मा यांच्यात केवळ 24 चेंडूत 47 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. वृंदा दिनेश हिने पुन्हा एकदा शानदार फलंदाजी करत 20 चेंडूत 42 धावांची खेळी खेळली. तिच्या या आक्रमक डावामुळे भारताने अवघ्या 13.3 षटकांत लक्ष्य गाठत सहज विजय मिळवला.
टीम इंडिया अंतिम सामना कोणाशी भिडणार?
या स्पर्धेचा अंतिम सामना 22 फेब्रुवारी रोजी होणार असून भारताचा सामना पाकिस्तान किंवा बांगलादेश यांच्यापैकी एका संघाशी होण्याची शक्यता आहे. त्या दोन्ही संघांमधील उपांत्य सामना अद्याप बाकी आहे. भारतीय संघाची ही विजयी घोडदौड अंतिम सामन्यातही कायम राहील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा –
Comments are closed.