हिंदुस्थानी महिलांचा ऑस्ट्रेलियावर मालिकाविजय; यास्तिका, राधा आणि तनुजाची अर्धशतके

‘हिंदुस्थान अ’ महिला संघाने ‘ऑस्ट्रेलिया अ’विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत दोन विकेटने विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
‘ऑस्ट्रेलिया अ’ची कर्णधार ऑलिसा हिलीच्या 87 चेंडूंतील 91 धावांच्या आक्रमक खेळीमुळे यजमानांनी 9 बाद 265 धावांचे आव्हान उभारले होते. प्रत्युत्तरात ‘हिंदुस्थान अ’ची स्थिती 7 बाद 193 अशी गंभीर असताना यास्तिका भाटिया (66), कर्णधार राधा यादव (60) आणि तनुजा पंवर (50) यांनी जबाबदारीची खेळी करत संघाच्या विजयावर एक चेंडू राखून शिक्कामोर्तब केले.
तनुजा (50)आणि प्रेमा रावत (ना. 32) यांची आठव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी निर्णायक ठरली. शेवटच्या षटकात प्रेमा आणि टिटास साधू यांनी उर्वरित पाच धावा काढत संघाला थरारक विजय मिळवून दिला. यापूर्वी, हिलीच्या अर्धशतकासोबतच किम गार्थच्या 41 धावांमुळे ‘ऑस्ट्रेलिया अ’ने स्पर्धात्मक धावसंख्या उभारली होती, मात्र ‘हिंदुस्थान अ’च्या चिकाटीसमोर यजमानांना पराभव पत्करावा लागला. हिंदुस्थानच्या मिन्नू मनीचे 46 धावांत 3 विकेट टिपले.
Comments are closed.