IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिला टी-20 सामना या कारणाने पुढे ढकलला जाणार? महत्वाची अपडेट समोर

भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातील टी-20 मालिका सुरू होण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा कालावधी बाकी आहे. मालिकेतील पहिला सामना 13 सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या पहिल्या सामन्यावर आता संकटाचे सावट आहे.
दिल्लीमध्ये 11 ते 13 सप्टेंबरदरम्यान ब्रिक्स परिषद होणार आहे. त्यामुळे सामन्याच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बीसीसीआय (BCCI) किंवा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली 3 टी-20 सामन्यांची मालिका दिल्लीमध्ये खेळवली जाणार आहे. मालिकेतील सर्व सामने अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहेत. पहिला सामना 13 सप्टेंबर, दुसरा 15 सप्टेंबर आणि तिसरा सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता अडचण निर्माण झाली आहे.
दिल्लीमध्ये 11 ते 13 सप्टेंबरदरम्यान ब्रिक्स परिषद आयोजित करण्यात आली आहे. या काळात देशातीलच नव्हे, तर जगातील अनेक मोठे आणि महत्त्वाचे नेते दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भारत-अफगाणिस्तान सामन्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे पोलिसांसाठी अडचणीचे ठरू शकते, अशी शक्यता आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या उपायुक्तांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला एक पत्र लिहिले असल्याचे समोर आले आहे. या पत्रात 13 सप्टेंबरऐवजी हा सामना अन्य कोणत्यातरी दिवशी घेण्याची विनंती करण्यात आली आहे. 13 सप्टेंबर रोजी दिल्लीत अनेक मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू केले जाणार आहेत. वाहतूक मार्गांमध्येही बदल केला जाणार आहे. तसेच या काळात सुमारे 20 ते 25 हजार लोकांच्या उपस्थितीची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांची प्राथमिकता भारत-अफगाणिस्तान टी-20 सामन्याऐवजी ब्रिक्स परिषदेला असेल.
यावर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने उत्तर देताना हा त्यांचा कार्यक्रम नसल्याचे सांगितले आहे. सामन्याच्या तारखेत कोणताही बदल झाल्यास त्याची माहिती योग्य वेळी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मालिकेतील पहिला सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 6.30 वाजता नाणेफेक होईल. सामना पूर्ण 20 षटकांचा झाल्यास तो रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. याबाबत आता पुढील निर्णय बीसीसीआयकडे आहे. बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड एकत्रितपणे काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.