'भारत' आघाडीची आज दिल्लीत बैठक

बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकजुटीचे प्रयत्न : 23 पक्षांच्या उपस्थितीची काँग्रेसला अपेक्षा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अलिकडेच पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपप्रणित सरकारला तोंड देण्यासंबंधीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची संभावना आहे. या विरोधी पक्षांच्या बैठकीत 23 पक्षांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. येथील कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी 23  पक्षांकडून सहभागाची विनंती करणारी पत्रे मिळाली आहेत, असे काँग्रेसच्या संपर्क विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी रविवारी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये सांगितले.

इंडिया आघाडीच्या बैठकीत महागाई, बेरोजगारी, संविधान आणि केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात एका समान रणनीतीवर चर्चा केली जाईल. ही बैठक सोमवारी दुपारी 12 वाजता दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणार आहे. विरोधी आघाडीतील काही पक्ष वैयक्तिक कारणांमुळे बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत, परंतु त्यांनी आघाडीच्या मुद्यांना आणि अजेंड्याला पाठिंबा दर्शवला आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. स्थापनेपासून इंडिया आघाडीने सहा बैठका घेतल्या आहेत. पहिली बैठक 23 जून 2023 रोजी पाटणा येथे नितीश कुमार यांनी बोलावली होती. नंतर नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडत एनडीएमध्ये सामील झाले होते. विरोधी आघाडीची शेवटची बैठक 1 जून 2024 रोजी झाली होती.

महागाई, रोजगार, अर्थव्यवस्था हे मुद्दे चर्चेत

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांच्या घरगुती बजेटवर परिणाम झाला आहे, तसेच लाखो भारतीयांच्या उपजीविकेवरही त्याचा परिणाम झाला आहे. याबाबत बैठकीत चर्चा होईल. तसेच रोजगार नसल्यामुळे लाखो तरुणांच्या आशा-आकांक्षांचा विश्वासघात झाला आहे. आर्थिक गुंतवणुकीचे वातावरणही कमकुवत झाले आहे. इंडिया अलायन्स या बैठकीत हे मुद्दे ठळकपणे मांडले जातील, असेही रमेश पुढे म्हणाले.

‘विविधतेत एकते’चा संदेश

भारताप्रमाणेच ‘इंडिया’ आघाडीतही आपल्या विविधतेनंतरही एकजूट कायम आहे. आघाडीतील सर्व पक्ष लोकशाही, संविधान आणि जनतेशी संबंधित मुद्यांवर एकाच व्यासपीठावर काम करत आहेत. काही पक्ष त्यांच्या स्वत:च्या कारणांमुळे बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत, परंतु त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांना आणि कृतींना तीव्र विरोध दर्शवला असल्याचेही जयराम रमेश यांनी सांगितले. या बैठकीत आगामी राजकीय रणनीती आणि केंद्र सरकारविरोधी संयुक्त मोहिमेवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

जॉन ब्रिटास यांची उपस्थिती निश्चित

सोमवारी होणाऱ्या विरोधी ‘इंडिया अलायन्स’च्या बैठकीत कोणते पक्ष सहभागी होतील, याबाबत चर्चा सुरू असतानाच भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) विरोधी पक्षाच्या बैठकीतील आपल्या सहभागाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पक्षाचे राज्यसभा सदस्य जॉन ब्रिटास हे बैठकीत इंडिया ब्लॉकचे प्रतिनिधित्व करतील, असे पक्षाकडून जाहीर करण्यात आले.

ममता, उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे हे बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी बंगालमधील टीएमसी नेत्यांवरील हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित करून इंडिया ब्लॉक पक्षांकडून पाठिंबा मिळवण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष खर्गे यांच्यासह अनेक नेतेही या बैठकीला उपस्थित असतील. तथापि, डीएमके आणि आम आदमी पार्टी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

टीव्हीकेला सोबत घेण्याचे प्रयत्न

मिळालेल्या वृत्तानुसार, 8 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत टीव्हीकेचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तामिळनाडूत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने घवघवीत यश संपादन करत सत्ताही हस्तगत केली आहे. थलपती विजय यांच्या या कामगिरीची दखल घेत भाजपविरोधी पक्ष म्हणून आता त्यांनाही ‘इंडिया’ आघाडीमध्ये सामावून घेण्याचा विचार केला जात आहे. विरोधी आघाडीतील मुख्य पक्ष असलेल्या काँग्रेसने तामिळनाडूत ‘टीव्हीके’ला साथ दिल्यामुळे आता थलपती विजय यांच्या बैठकीतील उपस्थितीची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Comments are closed.