आंदोलनावेळी खासदार महुआ मोईत्रांना भोवळ आली; संजय राऊत अन् राहुल गांधी मदतीला धावले

निवडणूक आयोगावरील इंडिया अलायन्स मोर्च: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील एका विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार असल्याचा आरोप पुराव्यासह केला होता. त्यानंतर या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने लोकसभा निवडणूक जिंकली, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला असून, याच दरम्यान बिहारमध्ये सुरू असलेल्या एसआयआर (SIR) प्रक्रियेवरही त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. ही प्रक्रिया खऱ्या मतदारांना मतदान यादीतून हटवण्याचा डाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज ‘इंडिया’ आघाडीतील खासदारांनी संसद भवन ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी मोर्चाला अटकाव केल्याचे पाहायला मिळाले.

या मोर्चात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सुमारे 300 खासदार सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान खासदार महुआ मोईत्रांना भोवळ आली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत आणि राहुल गांधी महुआ मोईत्रांच्या मदतीला धावल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं काय घडलं?

इंडिया आघाडीचं आंदोलन सुरु झाल्यानंतर संजय राऊत, राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना संसद पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दोन वेगवेगळ्या बसमध्ये भरून खासदारांना पोलीस ठाण्यात नेले जात होते. खासदारांना पोलीस ताब्यात घेत असताना टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांना बसमध्येच भोवळ आली. संजय राऊत आणि राहुल गांधी यांना याबाबत माहिती मिळताच ते महुआ मोईत्रा यांच्या मदतीसाठी धावल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

पोलिसांची नजर चुकवत अखिलेश यादव बॅरिकेटवर चढले

दरम्यान, या सगळ्या गदारोळात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव हे पोलिसांचा डोळा चुकवून बॅरिकेटवर चढले होते. याठिकाणी पोलिसांनी तीन-चार बॅरिकेटसची रांग करुन एक कुंपणच तयार केले होते. मात्र, अखिलेश यादव पोलिसांना चकवून बॅरिकेटसवर चढले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शिताफीने बॅरिकेटसची रांग ओलांडून पलीकडे गेले. मात्र, त्यानंतर अखिलेश यादव यांना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले. यानंतर अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीच्या खासदारांसह रस्त्यावरच बसकण मारत ठिय्या आंदोलन सुरु केले.

https://www.youtube.com/watch?v=j6jpwkk2xle

आणखी वाचा

हे डरपोक सरकार, व्होट चोर गादी सोड! प्रियांका गांधींची घोषणाबाजी; निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणाऱ्या राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांची धरपकड, धक्काबुक्कीचा आरोप

आणखी वाचा

Comments are closed.