भारताने डेंग्यूच्या पहिल्या लसीला मान्यता दिली.

4-60 वयोगटातील लोक घेऊ शकणार लस : डब्ल्यूएचओकडूनही शिफारस

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतात डेंग्यूविरोधातील लढाईत मोठे यश प्राप्त झाले आहे. आता देशात डेंग्यूवर लस उपलब्ध झाली आहे. जपानी औषध कंपनी टाकेडा फार्मास्युटिकलची डेंग्यू व्हॅक्सीन ‘क्यूडेंगा’ला भारतीय औषध नियामकाकडून मंजुरी मिळाली आहे. याचबरोबर भारतात स्वीकृत होणारी ही पहिली डेंग्यू व्हॅक्सीन ठरली आहे. कंपनीच्या भारतीय शाखेने सोमवारी या निर्णयाची माहिती दिली आहे.

क्यूडेंगा ही एक टेट्रावेलेंट लाइव-अटेनुएटेड व्हॅक्सीन असून त्याला डेंग्यू व्हायरसच्या चारही वेरियंटपासून सुरक्षा देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या व्हॅक्सीनचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे ती यापूर्वी डेंग्यूची लागण झालेली असो किंवा नसो दोन्ही स्थितींमध्ये ती दिली जाऊ शकते. याकरता लसीकरणापूर्वी कुठल्याही प्रकारची चाचणी करण्याची आवश्यकता नसेल. कंपनीनुसार दीर्घ काळाच्या क्लिनिकल डाटातून ही व्हॅक्सीन डेंग्यूचा आजार आणि याच्यामुळे रुग्णालयात भरती होण्यापासून मोठ्या प्रमाणात सुरक्षा पुरवू शकते.

यापूर्वी व्हॅक्सीनच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी टाकेडाने 2024 साली भारतीय व्हॅक्सीन उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ईसोबत एक मोठी भागीदारी केली होती. या कराराच्या अंतर्गत बायोलॉजिकल ई वार्षिक 5 कोटी डोस तयार करण्याची क्षमता विकसित करत आहे. याच्या मदतीने टाकेडाने या दशकाच्या अखेरपर्यंत जगभरात दरवर्षी 10 कोटी डोस निर्माण करण्याचे लक्ष्य बाळगले आहे.

43 देशांमध्ये मंजुरी

क्यूडेंगा लसीला आतापर्यंत 43 देशांमध्ये मंजुरी मिळाली असून जगभरात याचे 3.2 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत अशी माहिती टाकेडाच्या इंटरकॉन्टिनेंटल मार्केट्सचे प्रमुख महेंद्र नायक यांनी दिली. मागील 2 दशकांमध्ये भारतात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 11 पटीने वाढली आहे. जगभरात डेंग्यूच्या एकूण रुग्णांपैकी जवळपास एक तृतीयांश हिस्सा भारतात नोंदविला जातो. अशास्थितीत ही मंजुरी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

कोणाला देता येणार लस?

या लसीला 4 ते 60 वयोगटातील लोकांसाठी मंजुरी मिळाली आहे. या लसीचे एकूण दोन डोस दिले जाणार आहेत. दोन्ही डोसदरम्यान 3 महिन्यांचे अंतर असेल, ही लस त्वचेखाली टोचण्यात येणार आहे. डेंग्यू व्हायरसचे चार वेगवेगळे प्रकार आहेत. क्यूडेंगाने या चारही प्रकारांच्या विरोधात सुरक्षा देण्यास मदत करणारी लस विकसित केली आहे.

Comments are closed.