मुस्तफिजुर रहमानवर वाद का? शाहरुख खानला ‘अँटी नॅशनल’ का म्हटलं जातंय? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. IPL 2026 मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणार असून, यावरून सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. या फ्रँचायझीचा मालक अभिनेता शाहरुख खान असल्यामुळे, काही राजकीय नेते आणि धार्मिक वक्ते त्याच्यावर टीका करत आहेत.

IPL 2026 च्या लिलावात मुस्तफिजुर रहमान हा बांगलादेशमधील एकमेव खेळाडू ठरला, ज्याला खरेदी करण्यात आलं. कोलकाता नाइट रायडर्सने 9.20 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतलं. लिलावाच्या वेळी यावर फारसा आक्षेप नोंदवला गेला नव्हता. मात्र, अलीकडच्या काही घटनांनंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

वादाची ठिणगी बांगलादेशमध्ये घडलेल्या एका घटनेनंतर पडली. काही दिवसांपूर्वी तेथे दोन हिंदू युवकांची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी असा सवाल उपस्थित केला की, बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना, त्या देशातील खेळाडूंना भारतात येऊन IPL मध्ये खेळण्याची परवानगी कशी दिली जावी?

या पार्श्वभूमीवर काहींनी बांगलादेशी खेळाडूंवर IPL मधून बंदी घालण्याची मागणी केली. वाद आणखी वाढला, जेव्हा भागवताचार्य देवकीनंदन ठाकूर यांनी शाहरुख खान यांच्यावर भारतविरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजप नेते संगीत सोम यांनीही शाहरुख खान यांना ‘गद्दार’ असे संबोधले. या वक्तव्यांमुळे राजकीय आणि सामाजिक पातळीवर तीव्र वाद निर्माण झाला.

दरम्यान, बांगलादेशच्या खेळाडूंवर IPL बंदी घालण्यात येणार का, याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या अशा कोणत्याही निर्णयाचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं. “मुस्तफिजुर रहमान IPL खेळणार आहे. बांगलादेश हा भारताचा शत्रू देश नाही,” असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या IPL मध्ये फक्त पाकिस्तानच्या खेळाडूंना सहभागाची परवानगी नाही. त्यामुळे मुस्तफिजुर रहमान IPL 2026 मध्ये खेळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र, या मुद्द्यावरचा वाद लवकर शांत होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments are closed.