मुंबईच्या एकट्या पठ्ठ्याने सामना फिरवला! टीम इंडियाची विजयाची हॅट्ट्रिक, 408 धावांचा डोंगरासमोर

U19 आशिया चषक स्पर्धेत भारताचा मलेशियावर 315 धावांनी विजय अंडर-19 आशिया कप 2025 मध्ये युवा भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी जबरदस्त सुरूच आहे. स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर, आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यातही दणदणीत विजय नोंदवत हॅट्ट्रिक पूर्ण केली. ग्रुप टप्प्यातील तिसऱ्या सामन्यात भारताने मलेशियावर तब्बल 315 धावांनी मात केली.

अभिज्ञान कुंडूच्या विक्रमी द्विशतकामुळे 408 धावा

दुबई येथे मंगळवार 16 डिसेंबर रोजी खेळल्या गेलेल्या ग्रुप ‘अ’च्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. यूएईविरुद्ध 433 धावा उभारल्यानंतर भारताने पुन्हा एकदा 400 धावांचा टप्पा ओलांडला. वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करत अर्धशतक झळकावले, मात्र या डावाचा खरा नायक ठरला विकेटकीपर-फलंदाज अभिज्ञान कुंडू.

मधल्या फळीत सातत्याने धडाकेबाज खेळी करणाऱ्या कुंडूने या सामन्यात इतिहास रचला. त्याने अवघ्या 44 चेंडूत अर्धशतक, तर 80 चेंडूत शतक पूर्ण केले. शतकानंतर त्याचा खेळ आणखीच आक्रमक झाला. पुढील फक्त 41 चेंडूंमध्ये त्याने आणखी 100 धावा करत 121 चेंडूत द्विशतक ठोकले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत हे द्विशतक झळकावणारा कुंडू या स्पर्धेतील सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला. त्याला वेदांत त्रिवेदीने 90 धावांची मोलाची साथ दिली. मलेशियाकडून मुहम्मद अकरमने सर्वाधिक 5 बळी घेतले.

दीपेश देवेंद्रनच्या माऱ्यासमोर मलेशिया निष्प्रभ

409 धावांचे अवघड लक्ष्य मलेशियासाठी सुरुवातीपासूनच अशक्य होते. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबाव कायम ठेवला. दीपेश देवेंद्रन याने आपल्या पहिल्याच 5 षटकात 5 बळी घेत मलेशियाच्या फलंदाजीचा कणा मोडला. अवघ्या 38 धावांत 7 गडी बाद झाले होते. अखेरीस हमजा पंगीने केलेल्या 35 धावांमुळे मलेशियाचा संघ कसाबसा 93 धावांपर्यंत पोहोचू शकला.

हे ही वाचा –

अनकॅप्ड खेळाडूंवर पैशांचा पाऊस! प्रशांत–कार्तिक टॉपवर, आकिबला मिळाले 8.4 कोटी, सरफराज, पृथ्वी शॉ Unsold, आतापर्यंत लिलावात काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.