Ind vs Pak सामन्यानंतर पॉइंट्स टेबलचा चेहरामोहराच बदलला! सलग दोन पराभवानंतर पाक तोंडावर आपटला
आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 गुण सारणी: आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 मध्ये टीम इंडियाने आपली विजयाची मालिका कायम ठेवत पाकिस्तानलाही (India beat Pakistan) पराभूत केलं. कोलंबो येथे झालेल्या या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील भारतीय संघाने दमदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानवर 88 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर वर्ल्ड कपमधील दोन्ही सामने जिंकत भारताने शानदार सुरुवात केली आहे. दरम्यान, कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलचा चेहरामोहराच बदला आहे. भारताने 88 धावांनी विजय मिळवत 2 मौल्यवान गुण आपल्या खात्यात जमा केले. तर शिवाय, पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानचे स्थान खालावत असल्याचे दिसून येत आहे.
सलग दोन पराभवानंतर पाकिस्तान तोंडावर आपटला, तर टीम इंडियाचा जलवा सुरूच (ICC Women’s World Cup 2025 Points Table)
या विजयासह भारताने स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला आहे. याआधीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. दोनही सामने जिंकल्याने भारताचे एकूण 4 गुण झाले असून गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागल्याने तो संघ सध्या सहाव्या स्थानावर आहे. आतापर्यंत भारताने दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे. भारताचा नेट रन रेट आता 1.515 झाला आहे. दुसऱ्या स्थानावर 3 गुणांसह ऑस्ट्रेलिया आहे, तर इंग्लंड तिसऱ्या आणि बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान सध्या 2 सामन्यांत शून्य गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. गुणतालिकेत सध्या दक्षिण आफ्रिका शेवटच्या स्थानी आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक हरवल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय महिला संघाला स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या सलामी जोडीने चांगली सुरुवात करून दिली. दोघींनी मिळून केवळ 54 चेंडूत 48 धावांची भागीदारी केली. मात्र, स्मृती मंधाना 23 धावा करून माघारी परतली. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने भारतीय फलंदाजांना माघारी धाडत भारतीय संघाला 250 धावांपर्यंत पोहोचू दिले नाही. अखेर भारताची संपूर्ण संघ 50 षटकांत फक्त 247 धावांवर बाद झाली.
प्रतिका रावलने 37 चेंडूत 31 धावा केल्या, तर हरलीन देओलने 65 चेंडूत 46 धावा फटकावल्या. जेमिमा रॉड्रिग्जने 37 चेंडूत 32 धावा केल्या. ऋचा घोषने शेवटच्या टप्प्यात केवळ 20 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर नाबाद 35 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून डायना बेग हिने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर सादिया इक्बाल आणि कर्णधार फातिमा सना यांना प्रत्येकी दोन बळी मिळाले.
247 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान महिला संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. केवळ 26 धावांवर त्यांचे तीन गडी तंबूत परतले. त्यानंतर सिद्रा अमीन आणि नतालिया परवेज यांनी चौथ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण नतालिया परतताच पाकिस्तानची फलंदाजी पुन्हा कोसळली. सिद्रा अमीनने 106 चेंडूत 81 धावांची उत्कृष्ट खेळी केली. नतालिया परवेजने 46 चेंडूत 33 धावा केल्या. याशिवाय विकेटकीपर सिद्रा नवाज हिने 22 चेंडूत 14 धावांची छोटी पण उपयोगी खेळी केली. बाकीच्या फलंदाजांनी मात्र निराशा केली आणि अखेर पाकिस्तानचा संपूर्ण संघ 43 षटकांत 159 धावांवर गारद झाला.
भारताकडून क्रांती गौड हिने अफलातून गोलंदाजी करत 10 षटकांत 3 मेडनसह केवळ 20 धावा देऊन 3 बळी घेतले. तिच्या या शानदार कामगिरीमुळे तिला ‘सामनावीर’ (Player of the Match) पुरस्काराने गौरवण्यात आले. तिच्याबरोबरच दीप्ती शर्मानेही 3 बळी घेतले, तर स्नेह राणाने 2 बळी मिळवले.
आणखी वाचा
Comments are closed.