रांचीत रो-कोने पराभवाला रोखले; आफ्रिकन फलंदाजांचा संघर्ष शेवटच्या षटकात हरला

क्रिकेटप्रेमींचे हृदयाचे ठोके चुकवणारा आणि नखं कुरतडायला लावणारा आजचा सामना रांचीला होता की केपटाऊनला हेच कळत नव्हते. 130 धावांत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ गारद झाल्यावर हिंदुस्थानी चाहते संडे पार्टीच्या मोडवर गेले होते. पण अचानक क्रिकेटदेवाने सामन्याची स्क्रीप्ट बदलली आणि सातव्या-आठव्या क्रमाकांच्या फलंदाजांना नायक बनवून मैदानात उतरवले. आधी मार्को यान्सन आणि मग कार्बिन बॉशने चौकार-षटकारांची बरसात करत हिंदुस्थानी गोलंदाजांच्या तोंडाला अक्षरशा फेस आणला. पण संयमाने खेळणाऱया हिंदुस्थानी संघाने बॉशच्या खेळीचा शेवट करत अवघ्या 17 धावांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि हिंदुस्थानच्या रो-कोने पराभवाला रोखत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

विराट कोहलीचे घणाघाती शतकाच्या जोरावर हिंदुस्थानने आफ्रिकेसमोर 350 धावांचे आव्हान उभारले होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱया आफ्रिकेची हर्षित राणाने आपल्या पहिल्या तीन चेंडूंतच 2 बाद 7 अशी अवस्था केली. कर्णधार एडन मार्करमचा अडझळा अर्शदीप सिंगने दूर करत 3 बाद 11 अशा संकटात पाडले. त्यानंतर आफ्रिकेच्या मधल्या फळीसह तळाच्या फलंदाजांनी आपले योगदान देत सामन्यात आफ्रिकेचे आव्हान जिवंत ठेवले. मॅथ्यू ब्रीझके (72) आणि मार्को यान्सन (70) यांनी सहाव्या विकेटसाठी 97 धावांची भागी रचत संघाच्या जिवात जीव आणला. मग तळाला कॉर्बिन बॉशने 51 चेंडूंत 4 षटकार आणि 5 चौकारांचा झंझावात करत आफ्रिकेला विजयाच्या उंबरठय़ावर नेले. मात्र शेवटच्या षटकांत 19 धावांची गरज असताना  प्रसिध कृष्णाने त्याची विकेट काढत हिंदुस्थानला मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला.

त्याआधी, पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या विरोधात गेला. मात्र, प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 8 बाद 349 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यशस्वी जैस्वालने मार्को यान्सनला चौकार अन् षटकार ठोकून खणखणीत सुरुवात केली होती. मात्र नाण्ड्रे बर्गरने चौथ्या षटकात अचूक लांबीच्या चेंडूवर जैस्वालला चकवत यष्टीमागे डिकॉककरवी झेलबाद केले.

विराटचे शतक, राहुलचे अर्धशतक

हिंदुस्थानने 30.3 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 200 धावांचा टप्पा गाठल्यानंतर विराट व आलेला कर्णधार लोकेश राहुल यांची जोडी जमली. दरम्यान विराटने वन डे कारकीर्दीतील आपले विक्रमी 52 वे शतक साजरे केले. त्याच्या 120 चेंडूंतील 135 धावांच्या देखण्या खेळीला 11 चौकार व 7 षटकारांचा साज होता. शेवटी बर्गरला मैदानाबाहेर भिरकाविण्याच्या नादात विराटने रिकल्टनकडे झेल दिला. त्यानंतर राहुलने रवींद्र जाडेजाला हाताशी धरून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 56 चेंडूंत 3 षटकार व 2 चौकारांसह 60 धावांची खेळी केली, तर जाडेजाने 20 चेंडूंत 2 चौकार व एका षटकारासह 32 धावा फटकाविल्या. या दोघांना अनुक्रमे यान्सन व बोचने बाद केले.

रुतुराज कमनशिबी, सुंदरची निराशा

रोहित बाद झाल्यानंतर संधी मिळालेल्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडून खुप अपेक्षा होत्या, मात्र खेळपट्टीवर सेट होण्यापूर्वीच ओर्टनील बार्टमनच्या गोलंदाजीवर डेवाल्ड ब्रेविसने बॅकवर्ड पॉइंटवर सुर मारून अप्रतिम झेल टिपला अन् ऋतुराज कमनशिबी ठरला. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने निराशा केली. तो बार्टमनच्याच गोलंदाजीवर 13 धावांवर बोचकरवी झेलबाद झाला.

रोहितविराट जोडीची शैलीदार भागीदारी

जैस्वालला बाद केल्यानंतर बर्गरने याच षटकात आधी आलेल्या विराट कोहलीला तिसऱया स्लिपमध्ये, तर नंतर रोहित शर्माला पुल शॉटवर चकवले. विराटचा झेल सोपा नव्हता, पण लाँग-लेगवर टोनी डी झॉर्जीने सूर मारून टिपलेला झेल सोडला अन् रोहित बचावला. मात्र त्यानंतर ही माजी कर्णधारांची जोडी जमली. त्यांनी शैलीदार अंदाजात 109 चेंडूंत दुसऱया विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. यान्सनने 22व्या षटकांत रोहितला पायचित पकडून ही जोडी पह्डली अन् दक्षिण आफ्रिकेने सुटकेचा निःश्वास सोडला. रोहितने 51 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांच्या साह्याने 57 धावांची खेळी केली.

Comments are closed.