टीम इंडियाने फक्त तीन दिवसांत वेस्ट इंडिजचा फडशा पाडला, अहमदाबाद कसोटीत भारताचा मोठा विजय, WTC


भारताने वेस्ट इंडीज 1 ला कसोटी 2025 असा विजय मिळविला: 28 सप्टेंबरला झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाच गडी राखून पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास गगनाला भिडला होता. त्याच लयीत भारतीय खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजवर जोरदार दणका दिला. 2 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या मालिकेच्या पहिल्याच कसोटीत भारताने एक डाव आणि तब्बल 140 धावांनी विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली.

पहिल्या डावात वेस्ट इंडिजचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकूच शकले नाहीत. अवघ्या 162 धावांत त्यांची पूर्ण टीम गडगडली. प्रत्युत्तर भारतीय फलंदाजांनी आपली ताकद दाखवली. के.एल. राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजाच्या शतकी खेळींमुळे टीम इंडियाने 448/5 वर डाव घोषित करत 286 धावांची भक्कम आघाडी घेतली. ही आघाडी वेस्ट इंडिजसाठी डोंगर ठरली. दुसऱ्या डावात ते फक्त 146 धावांवरच गारद झाले. अशा प्रकारे भारताने एक डाव आणि 140 धावांनी पहिला सामना आपल्या नावावर केला. मात्र या शानदार विजयाचा भारताच्या WTC पॉइंट्स टेबलवर काहीही परिणाम झाला नाही. सामना जिंकूनही भारत तिसऱ्या स्थानावरच आहे.

वेस्ट इंडिजचा पहिला डाव : सिराजने वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचे मोडले कंबरडे

पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण तो त्यांच्यासाठी विनाशकारी ठरला. संपूर्ण संघ फक्त 162 धावांतच आटोपला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबाव आणला. मोहम्मद सिराजने चार, जसप्रीत बुमराहने तीन, कुलदीप यादवने दोन आणि सुंदरने एक बळी घेतला. वेस्ट इंडिजकडून फक्त जस्टिन ग्रीव्हज (32), शाई होप (26) आणि कर्णधार रोस्टन चेस (24) हे काही काळ टिकले, पण उर्वरित फलंदाज भारतीय आक्रमणासमोर टिकू शकले नाहीत.

भारताचा पहिला डाव : के.एल. राहुल, ध्रुव जुरेल अन् रवींद्र जडेजाचं शतकं

अहमदाबाद कसोटीत कॅरिबियन फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर फार टिकू शकले नाहीत, पण भारतीय फलंदाजांनी धमाकेदार प्रदर्शन केले. के.एल. राहुल (100), ध्रुव जुरेल (125) आणि रवींद्र जडेजा (104*) यांनी शतकी खेळी केली. कर्णधार शुभमन गिलने अर्धशतक झळकावले. यशस्वी जैस्वाल (36) आणि साई सुदर्शन (7) स्वस्तात बाद झाले. दुसऱ्या दिवसाअखेर जडेजा 104 आणि वॉशिंग्टन सुंदर 9 धावांवर नाबाद होते. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने 448/5 धावांवर डाव घोषित केला.

वेस्ट इंडिजचा दुसरा डाव : पुन्हा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी टेकले गुडघे

पहिल्या डावाच्या आधारावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर तब्बल 286 धावांची आघाडी घेतली. पण दुसरा डाव वेस्ट इंडिजची धक्कादायक सुरुवात झाला. अवघ्या 50 धावांच्या आतच पाहुण्या संघाचे पाच गडी बाद झाले. रवींद्र जाडेजाने जॉन कॅम्पबेल (14 धावा), ब्रँडन किंग (5 धावा) आणि शाय होप (1 धाव) यांना माघारी पाठवले. मोहम्मद सिराजने तैजनारायण चंद्रपॉल (8 धावा) याला बाद केले, तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने कर्णधार रोस्टन चेसला स्वस्तात तंबूत धाडले. पाच विकेट गमावल्यानंतर, अ‍ॅलिक अथानासे (38) आणि जस्टिन ग्रीव्हज (25) यांनी 46 धावा जोडल्या. ही भागीदारी तुटल्यानंतर, भारताचा विजय केवळ औपचारिकता राहिली. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने चार विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराजने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादवने दोन आणि वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली.

आणखी वाचा

Comments are closed.