भारत सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन, एशिया कप रायजिंग स्टार्सच्या फायनलमध्ये बांग्लादेशला केले पराभूत

एसीसी विमेंस एशिया कप रायजिंग स्टार्स २०२६च्या अंतिम फेरीत आज (२२ फेब्रुवारी) भारत ए आणि बांग्लादेश ए संघ भिडले. हा सामना बॅंकॉकच्या तेर्दथाई क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात भारताने बांग्लादेशला १३५ धावांचे लक्ष्य दिले होते. हा सामना भारताने ४६ धावांनी जिंकला आणि इतिहास रचला.
या स्पर्धेत भारत राधा यादवच्या नेतृत्वाखाली खेळला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये भारताची सुरूवात काहीशी चिंताजनक झाली. संघाने पहिल्या तीन विकेट्स ६.२ षटकात ३३ धावसंख्येवर गमावल्या. त्यानंतर तेजल हसबनीस आणि राधाने संघाचा डाव सांभाळला. दोघींनी पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केल्याने भारताला १००च्या पुढे धावसंख्या करता आली.
राधाने ३६ धावा केल्या. तिने ३० चेंडूत ३ चौकार आणि एक षटकार मारले. तेजल ५१ धावा करत नाबाद राहिली. तिने ३४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकरांच्या साहाय्याने ही खेळी केली. त्यामुळे भारताने २० षटकात ७ विकेट्स गमावत १३४ धावसंख्या केली. विजयासाठी हे कमी लक्ष्य वाटत असताना भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. त्यामुळे बांग्लादेशचा डाव १९.१ षटकातच संपुष्टात आला. त्यांनी सर्व विकेट्स गमावत केवळ ८८ धावा केल्या.
यामध्ये भारताकडून प्रेमा रावतने प्रभावी गोलंदाजी केली. तिने ४ षटकात १२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. सोनिया मेंढीया आणि तनुजा कंवर या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. राधानेही एक विकेट घेतली. तसेच तेजलला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.
या स्पर्धेत भारत ए ग्रुप-ए मध्ये होता. त्यामध्ये पाकिस्तान ए, नेपाळ ए आणि संयुक्त अरब अमिराती ए या संघांचा समावेश होता. ग्रुप बी मध्ये थायलंड, मलेशिया, बांग्लादेश आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. यामधील भारत आणि पाकिस्तान ग्रुप ए मधून, श्रीलंका आणि बांग्लादेश ग्रुप-बी मधून उपांत्य फेरीत पोहोचले. हे सामने २० फेब्रुवारीला खेळले गेले.
भारताचे या स्पर्धेचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे.
Comments are closed.