‘मतचोरी विसरणार नाही, माफही करणार नाही’; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; रामलीला मैदानावर विरोधकांची एकजूट – TMarathiNews
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीने राजधानी दिल्लीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत विरोधी पक्षांच्या नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. सुमारे चार तास चाललेल्या या आंदोलनात 20 विरोधी पक्षांनी सहभाग घेतल्याचा दावा करण्यात आला.
या रॅलीला डाव्या पक्षाचे नेते एम. ए. बेबी, बिहारचे नेते तेजस्वी यादव, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी संबोधित केले. अखेरीस लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषण करत निवडणूक आयोग आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतचोरीचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला. “ज्ञानेश कुमार यांनी मतचोरीचा कट रचला असून त्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे,” असे ते म्हणाले. भाजप निवडणुकांमध्ये हेराफेरी करत राहू शकतो; मात्र देशातील जनता आणि विरोधी पक्ष हे विसरणार नाहीत किंवा माफ करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
एसआयआर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करताना राहुल गांधी यांनी सुमारे 13 कोटी, म्हणजेच 15 टक्के मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा दावा केला. यापैकी अनेक मतदारांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते, असेही त्यांनी सांगितले. 2024 च्या निवडणुकीतील विजयाचे अंतर केवळ तीन टक्के होते, असा उल्लेख करत मतदार यादीतील बदलांचा निवडणूक निकालांवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“मुख्य निवडणूक आयुक्तांना वाटत असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांना वाचवतील, तर त्यांनी देशातील जनतेचा मूड पाहावा. मतदारांच्या हक्कांवर हल्ला केला जात आहे. जनतेच्या मनातील रोष दुर्लक्षित करता येणार नाही,” असे राहुल गांधी म्हणाले. संसदेत विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप करत जनतेच्या पाठिंब्यामुळेच विरोधकांना आपली भूमिका मांडता येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला. “ते अंडरवर्ल्डमध्ये गेले तरी आम्ही त्यांना शोधून परत आणू. आम्ही त्यांना सोडणार नाही,” असे आक्रमक वक्तव्य त्यांनी केले. विरोधकांनी केलेल्या खुलाशांनंतरही भाजपने ज्ञानेश कुमार यांना पदावर कायम ठेवण्याचा आग्रह धरल्यास त्यामागील भूमिका ओळखली जाईल, असेही खर्गे म्हणाले.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाची मागणी पुढे आणण्यासाठी विरोधकांनी दिल्लीत प्रातिनिधिक संसदेचे आयोजन केले. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान माजी लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी भूषवले. सुमारे तीन तास 23 मिनिटे चाललेल्या या अधिवेशनात काँग्रेससह 19 पक्षांचे 215 खासदार सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.
या अधिवेशनात खर्गे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडला. त्यात त्यांच्यावर सहा आरोप ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. उपस्थित खासदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. घटनात्मक पदावरील व्यक्तीविरोधात जनतेने किंवा राजकीय पक्षांनी निषेध व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेली ही प्रातिनिधिक प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
“मुख्य निवडणूक आयुक्तांच्या महाभियोगावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाला बागेत बसावे लागत आहे. कारण इतर सर्व संस्था आमच्यासाठी बंद झाल्या आहेत,” अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. एसआयआर आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून इंडिया आघाडीने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने आगामी काळात हा मुद्दा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
Comments are closed.