व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्रपती हिंदुस्थानला भेट देणार, अमेरिकेची घोषणा; काय आहे कारण? वाचा…
आखाती देशातील तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संकटाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातील इंधन पुरवठा आणि ऊर्जा सुरक्षेची समस्या बिकट रुप घेत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी एक मोठी घोषणा केली आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज पुढील आठवड्यात हिंदुस्थानला भेट देणार असून या भेटीत तेल पुरवठा आणि ऊर्जा सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
याबाबत रुबियो म्हणाले की, हिंदुस्थानने हवे तितके कच्चे तेल खरेदी करावे, अशी अमेरिकेची इच्छा आहे. हिंदुस्थानला जितकी ऊर्जा लागेल, तितकी विकण्यास आम्ही तयार आहोत. व्हेनेझुएलाच्या तेलामध्येही महत्त्वपूर्ण संधी आहेत, असा आमचा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.
मार्को रुबियो म्हणाले की, व्हेनेझुएलाचे अंतरिम राष्ट्रपती पुढील आठवड्यात हिंदुस्थानला भेट देणार आहेत. रुबियो यांचे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील संकटामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे आणि हिंदुस्थान पर्यायी पुरवठा मार्गांच्या शोधात आहे. त्यामुळे याला महत्त्व आले आहे.
हिंदुस्थान जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाच्या आयातदारांपैकी एक आहे आणि आपल्या तेलाच्या गरजांचा मोठा भाग आयात करतो. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढल्यानंतर, हिंदुस्थान पुरवठ्यात विविधता आणण्यावर भर देत आहे. या संदर्भात, व्हेनेझुएला, ज्याच्याकडे जगातील सर्वात मोठा तेलसाठा आहे, तो हिंदुस्थानसाठी एक महत्त्वाचा पर्याय म्हणून उदयास येत आहे.
जानेवारी २०२६ मध्ये अमेरिकेने लष्करी कारवाई करून निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर, डेल्सी रॉड्रिग्ज यांची अंतरिम राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून अमेरिका आणि, वॉशिंग्टन आणि व्हेनेझुएला यांच्यातील संबंधांमध्ये बदल झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल कंपन्यांना दिलेल्या सहकार्याबद्दल रॉड्रिग्ज यांची अनेक वेळा प्रशंसा केली आहे.
व्हेनेझुएलाचे नवीन सरकार परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तेल क्षेत्रात मोठ्या सुधारणा राबवत आहे. यामध्ये अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना अधिक स्वातंत्र्य देणे, कर कमी करणे आणि पीडीव्हीएसएची (PDVSA) मक्तेदारी कमकुवत करणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.
रुबियो २३ ते २६ मे दरम्यान हिंदुस्थानचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात ऊर्जा सुरक्षा, संरक्षण सहकार्य, व्यापार आणि इंडो-पॅसिफिक धोरणावर चर्चा होईल. व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती आणि रुबियो यांचा दौरा हिंदुस्थानच्या ऊर्जा धोरणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
Comments are closed.