कंगाल पाकिस्तानच्या कुरापतींमुळे टीम इंडियाला मोठा झटका! ICC स्पर्धा भारताबाहेर शिफ्ट होणार?

आयसीसी स्पर्धांचे ठिकाण शिफ्ट आयसीसी विरुद्ध बीसीसीआय बातम्या : गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यातील तणावाने जागतिक क्रिकेटचे लक्ष वेधून घेतले आहे. भारत-पाकिस्तानमधील (India Vs Pakistan) राजकीय वादातून सुरू झालेला हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मोठे आव्हान बनू लागला आहे. परिस्थिती अशीच राहिली, तर पुढील काही वर्षांत भारताकडून मोठ्या आयसीसी स्पर्धांची मेजबानीही हिरावली जाऊ शकते.

भारताकडून मेजबानी का जाऊ शकते?

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये दीर्घकाळापासून असलेल्या राजकीय तणावामुळे दोन्ही संघ एकमेकांच्या देशात जाऊन खेळण्यास नकार देत आहेत. त्यामुळे आयसीसीला ‘हायब्रिड मॉडेल’ स्वीकारावे लागले. या मॉडेलनुसार दोन्ही संघांतील सामने तटस्थ ठिकाणी जसे की श्रीलंका किंवा दुबई येथे आयोजित केले जातात. यापूर्वी भारताने 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता. त्यानंतर 2027 पर्यंत दोन्ही संघ एकमेकांच्या देशात खेळणार नाहीत, असा तडजोडीचा निर्णय झाला. मात्र आता ही मर्यादा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

स्पर्धा हलवण्याचा आयसीसीचा विचार

ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, आयसीसी भविष्यातील स्पर्धा भारताबाहेर हलवण्याचा विचार करत आहे. विशेषतः 2029 ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 चा वनडे वर्ल्ड कप दुसऱ्या देशात आयोजित केले जाऊ शकतात. कारण, जर भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या देशात खेळणार नसतील, तर भारतात मोठी स्पर्धा आयोजित करणे लॉजिस्टिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचे ठरेल. शिवाय, एखाद्या संघाने शेवटच्या क्षणी माघार घेतली, तर आर्थिक नुकसान कोट्यवधींच्या घरात जाऊ शकते आणि संपूर्ण वेळापत्रक कोलमडू शकते.

पाकिस्तानच नाही, बांगलादेशसोबतही तणाव

अलीकडेच बांगलादेशने सुरक्षा कारणास्तव टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतात येण्यास नकार दिला. आयसीसीने त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेशने स्पर्धेतूनच माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे आयसीसी अधिकारी आता ‘बॅकअप प्लॅन’वर गंभीरपणे चर्चा करत आहेत, जेणेकरून शेवटच्या क्षणी संकट उद्भवू नये.

सगळा खेळ पैशांचा

अहवालानुसार, केवळ एका भारत-पाक सामन्याची किंमत सुमारे 2100 कोटी रुपयांपर्यंत जाते. प्रचंड प्रेक्षकसंख्या आणि जाहिरातींच्या महसुलामुळे हा सामना जागतिक क्रिकेट अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. सध्याच्या टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये कोलंबो येथे झालेल्या भारत-पाक सामन्यालाही विक्रमी प्रेक्षकसंख्या लाभली. त्यामुळे राजकीय कारणांमुळे हा ‘हाय-व्होल्टेज’ सामना रद्द होऊ नये, यासाठी आयसीसी विशेष खबरदारी घेत आहे.

ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदार आहे

या सर्व पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया (Australia) मेजबानीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियाने 2015 आणि 2022 मध्ये यशस्वी वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तसेच पुढील टी-20 वर्ल्ड कपसाठी ते न्यूझीलंड सोबत सह-मेजबान असणार आहेत. एकूणच, भारत-पाक तणावाचा परिणाम आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचे पडसाद जागतिक क्रिकेटच्या भवितव्यावर उमटत असून, पुढील काही वर्षांत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा –

J&K Cricket Team Ranji Trophy Final : जम्मू-काश्मीरच्या पोरांनी करून दाखवलं, 67 वर्षांचा वनवास संपला! पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये एन्ट्री; जेतेपदासाठी कोणाला भिडणार?

आणखी वाचा

Comments are closed.