टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप! तिसरा वनडे 6 विकेट्सने जिंकत मालिका 3-0 ने खिशात

भारत अंडर-19 विरूद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-19 (IndiaU19 vs AustraliaU 19) दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा सुपडा साफ केला. भारतीय अंडर-19 संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा वनडे सामनाही जिंकला असून, तिसऱ्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. यासह भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 3-0 असा क्लीन स्वीप करत तीन सामन्यांची मालिका भारताने 3-0 अशी जिंकली.

बुधवारी राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर (Niranjan Shah Stadium) झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या अंडर-19 संघाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताने मालिकेतील पहिला सामना 7 धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने 103 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र, भारताने हा सामनाही जिंकत मालिकेत 3-0 असा विजय मिळवला.

तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचा अंडर-19 संघ 49.3 षटकांत 254 धावांवर सर्वबाद झाला. जेड हॉलिकने चार्ली हेंडरसनसोबत पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हॉलिकने नील पटेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 62 धावा जोडत संघाची धावसंख्या 100च्या पुढे नेली. हॉलिकने 88 चेंडूंमध्ये 87 धावा केल्या.

126 धावांपर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावले होत्या. त्यानंतर नील पटेलने मॅथ्यू लॉफसोबत 26 धावांची आणि ब्लेक कैटलसोबत 44 धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येच्या जवळ नेले. नील पटेल 71 चेंडूंमध्ये 51 धावा करून बाद झाला. त्यानंतर कैटलने 38 धावा करत ऑस्ट्रेलियाला 254 धावांपर्यंत पोहोचवले. भारताकडून मोहित उल्वा आणि मनल चौहान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर काव्य पटेल आणि आर्यन सवसाणी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या अंडर-19 संघाने 41.2 षटकांत 4 विकेट्स गमावत 255 धावांचे लक्ष्य सहज गाठले. कर्णधार लक्ष्य रैचंदानीने आर्यवीर सेहवागसोबत पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. आर्यवीरने 31 चेंडूंमध्ये 5 चौकारांसह 34 धावा केल्या. त्यानंतर भारताने व्ही.के. विनीतची 10 धावांवर विकेट गमावली.

भारताची धावसंख्या 89 असताना संघाने 2 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर कर्णधार लक्ष्यने कुशाग्र ओझासोबत तिसऱ्या विकेटसाठी 96 चेंडूंमध्ये 85 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताची धावसंख्या 174 धावांपर्यंत पोहोचली. कुशाग्रने 53 चेंडूंमध्ये 5 चौकारांसह 45 धावा केल्या.

यानंतर कर्णधार लक्ष्यने रजत बघेलसोबत पाचव्या विकेटसाठी 57 चेंडूंमध्ये नाबाद 80 धावांची भागीदारी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. लक्ष्यने 106 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 110 धावांची शानदार खेळी केली. रजत बघेलने 34 चेंडूंमध्ये 7 चौकारांसह नाबाद 44 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून स्पेंसर ग्रीनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तर विल बायरम आणि जेकब पीट्झ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. यासह, भारताच्या अंडर-19 संघाने 3 सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने जिंकत ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप केला.

Comments are closed.