यूएईतील फुजैराह पेट्रोलियम इंडस्ट्रीज झोनवर इराणचा हल्ला; ३ हिंदुस्थानी जखमी, हिंदुस्थानकडून निषेध
इराणने संयुक्त अरब अमिरातीतील फुजैराह पेट्रोलियम इंडस्ट्रीज झोनवर हल्ला केला आहे. हिंदुस्थानने या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यात तीन हिंदुस्थानी नागरिक जखमी झाले असून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हा हल्ला “अस्वीकार्य” असल्याचे म्हटले आहे. एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या नाजूक युद्धविरामानंतर यूएईवर प्रथमच असा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी म्हटले की, “फुजैराहवरील हल्ल्यात तीन हिंदुस्थानी जखमी झाले, हा प्रकार अस्वीकार्य आहे. नागरिक आणि पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले तात्काळ थांबवावेत.” त्यांनी मध्यपूर्वेत शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि डिप्लोमसी मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले.
फुजैराहवरील हल्ल्याबाबत आमचे विधान ⬇️
🔗 https://t.co/01Nz7g06FR pic.twitter.com/KQAr8R9ciQ
— रणधीर जैस्वाल (@MEAIindia) 5 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करत म्हटले की, “नागरिक आणि पायाभूत सुविधांवर हल्ले अस्वीकार्य आहेत.” त्यांनी संयुक्त अरब अमिरातीसोबत एकात्मता दर्शवत सर्व प्रश्न संवाद आणि डिप्लोमसीद्वारे सोडवण्याचा आग्रह धरला. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीत सुरक्षित आणि निर्बाध नौवहन हे प्रादेशिक शांतता आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यूएईवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो ज्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले. नागरिक आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे अस्वीकार्य आहे.
भारत UAE सोबत दृढ एकजुटीने उभा आहे आणि सर्व समस्यांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी आपल्या समर्थनाचा पुनरुच्चार करतो…
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 5 मे 2026
संयुक्त अरब अमिरातीची प्रतिक्रिया
यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, इराणकडून डागण्यात आलेल्या १५ क्षेपणास्त्र आणि ४ ड्रोनना हवाई संरक्षण यंत्रणांनी अडवले. फुजैराहमधील मोठ्या तेल प्रकल्पावर एका ड्रोनमुळे आग लागली आणि तेथे काम करणारे तीन हिंदुस्थानी जखमी झाले. ब्रिटनच्या लष्करानेही यूएईजवळ दोन मालवाहू जहाजांना आग लागल्याची माहिती दिली.
इराणची भूमिका अस्पष्ट
इराणने या हल्ल्याची थेट कबुली दिलेली नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिका आणि यूएईने परिस्थिती अधिक चिघळू नये याची खबरदारी घ्यावी, असे म्हटले. इराणच्या एका अधिकाऱ्याने तेल प्रकल्पावर हल्ला करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा दावा करत यासाठी अमेरिकेच्या कारवाईला जबाबदार धरले.
होर्मुझ सामुद्रधुनीत वाढता तणाव
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढत असून होर्मुझ सामुद्रधुनीत संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अडकलेल्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यासाठी कारवाई करण्याचे जाहीर केल्यानंतर तणाव वाढला आहे.
ही सामुद्रधुनी इराण आणि ओमानदरम्यान असून जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. इराणने या मार्गावर निर्बंध आणल्यामुळे इंधन दर वाढले असून जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. शिपिंग कंपन्या आणि विमा कंपन्या वाढत्या धोक्यामुळे सावध भूमिका घेत आहेत.
Comments are closed.