IND vs AUS: एडिलेडमध्ये भारताचं रेकॉर्ड कसं? जाणून घ्या आकडे काय सांगतात

पर्थमध्ये फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे आणि पावसाच्या व्यत्ययाने प्रभावित झालेल्या सामन्यात भारताला 7 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर आता टीम इंडियाचं लक्ष्य दुसऱ्या वनडेत दमदार पुनरागमन करण्याचं असेल. ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्यात सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना एडिलेड ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.

या सामन्यात शुबमन गिल (Shubman gill) आणि त्याची टीम मालिकेत परत येण्याचा प्रयत्न करेल. हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जर भारत हा सामना हरला, तर मालिका त्यांच्या हातातून निसटेल. पण आकडेवारी पाहिली, तर रेकॉर्ड टीम इंडियाच्या बाजूने आहे.

एडिलेड ओव्हल मैदानावर आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 15 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 9 सामने जिंकले असून, 5 गमावले आहेत. एक सामना बिन निकालाचा ठरला. एडिलेड ओव्हलवर भारताचं विजयाचं प्रमाण 60 टक्के आहे.
तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने या मैदानावर एकूण 54 वनडे सामने खेळले आहेत, ज्यापैकी 37 जिंकले आणि 17 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजयाचा टक्का 68.51 इतका आहे.

एडिलेड ओव्हलवर सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज म्हणजे महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) . धोनीने या मैदानावर 6 सामन्यांत 131 च्या सरासरीने 262 धावा केल्या आहेत. त्यापैकी तो 4 वेळा नाबाद राहिला असून त्याच्या नावावर 3 अर्धशतके आहेत. तर विराट कोहलीने (Virat Kohli) 4 सामन्यांत 61 च्या सरासरीने 244 धावा केल्या आहेत. या मैदानावर कोहलीने 2 शतके झळकावली आहेत. त्याचा सर्वोच्च स्कोर 107 धावा आहे. कोहली हा इंग्लंडचा माजी फलंदाज ग्रीम हिक याच्यासह या मैदानावर परदेशी खेळाडू म्हणून सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे.

या मैदानावर भारताने केलेला सर्वोच्च धावसंख्या विक्रम म्हणजे 300/7. हा स्कोर भारताने 2015 मध्ये पाकिस्तानविरुद्ध केला होता.
एडिलेड ओव्हलवरील एकूण सर्वात मोठा धावसंख्या विक्रम 369/7 चा आहे, जो ऑस्ट्रेलियाने 26 जानेवारी 2017 रोजी पाकिस्तानविरुद्ध केला होता.

दोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत एकूण 153 वनडे सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 58 सामने जिंकले, तर 85 सामन्यांत पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये भारताचं एकूण विजयाचं प्रमाण 40.55 टक्के इतकं आहे.

Comments are closed.