भारत-युरोपियन युनियन करार जलद
महासंघाच्या अध्यक्षा उर्सेला लेयेन यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / दावोस
भारत आणि युरोपियन महासंघ एक ऐतिहासिक व्यापार करार करण्याच्या अगदी नजीक पोहचले असून, लवकरच हा करार अस्तित्वात येणार आहे. हा करार आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि व्यापक करार असेल, असे प्रतिपादन युरोपियन महासंघाच्या अध्यक्षा उर्सेला व्हॉन डर लेयेन यांनी केले आहे. त्या स्विट्झर्लंड देशातील डावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत भाषण करीत होत्या. त्यांच्या या प्रतिपादनाचे स्वागत भारताच्या उद्योगजगताने केले आहे.
या करारावर सध्या चर्चा केली जात आहे. अद्याप कराराला अंतिम स्वरुप देण्यात आलेले नाही. मात्र, ही प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात असून आम्ही एका ऐतिहासिक कराराच्या अगदी नजीक पोहचलो आहोत. या संबंधीची शुभवार्ता लवकरच सर्वांना मिळणार आहे, असे लेयेन यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले.
पुढच्या आठवड्यात भारतात
मी पुढच्या आठवड्याच्या शेवटी भारताचा दौरा करणार आहे. डावोस परिषद संपल्यावर हा दौरा आहे. या दौऱ्यात या कराराला वेग मिळण्याची शक्यता आहे. या कराराच्या माध्यमातून भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातील आर्थिक संबंध अधिक सखोल आणि सघन होतील. युरोपियन महासंघाच्या दृष्टीने भारत हे एक महत्वाचे राष्ट्र आहे. महासंघ आपल्या जागतिक भागीदारांसमवेत काम करण्याशी बांधील आहे. भारत हा आमचा महत्वाचा भागीदार होऊ शकतो. युरोपने नेहमीच जगाला मानले आहे आणि जगानेही युरोपला मानले आहे. आमचे ध्येय गुंतवणूक आणि व्यापारप्रधान अशा सुस्थिर आणि सुयोग्यरित्या नियमबद्ध वातावरणाची निर्मिती करणे हे आहे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले आहे.
ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य
ऊर्जा सुरक्षा हा युरोपच्या विकासतत्वाचा आधार आहे. विश्वासार्ह, स्वदेशी आणि स्वस्त ऊर्जेचे स्रोत निर्माण करणे, यावर आमचा भर आहे. ऊर्जा आणि व्यापार यांच्यासह संरक्षण साधनांचा विकास हे देखील आमचे ध्येय आहे. आमचा संरक्षणावरचा खर्च वाढला आहे. या संदर्भात आम्ही मागच्या एका वर्षात मागच्या एका दशकापेक्षा अधिक प्रगती केली आहे. युरोपियन महासंघाच्या सर्व सदस्य देशांनी त्यांच्या संरक्षण खर्चात प्रचंड मोठी वाढ केली आहे. अत्याधुनिक संरक्षण साधनांची निर्मिती करण्यासाठी महासंघात आज अनेक स्टार्टअप्स कार्यरत असून त्यांच्यातील तीन स्टार्टअप्स आता युनिकॉर्न पातळीपर्यंत पोहचले आहेत. आम्ही जगातील अन्य देशांनाही आमच्या प्रयत्नांमध्ये सहभागी करुन घेत आहोत. त्यामुळे भारताशी करार महत्वाचा आहे, अशी मांडणी त्यांनी भाषणात केली आहे.
भारताचा दौरा करणार
युरोपियन महासंघाच्या अध्यक्षा उर्सेला लेयेन आणि युरोपियन महामंडळाचे अध्यक्ष अँटोनिओ लुईस सँटोझ दा कोस्टा हे दोन्ही नेते भारतात गणतंत्र दिनाच्या संचलन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित केले आहे. 27 जानेवारीला भारत-युरोपियन महासंघ शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. हे दोन्ही नेते या परिषदेचे सहअध्यक्ष असतील. त्यावेळी त्यांची भारताच्या नेत्यांशी व्यापार कराराच्या दृष्टीने चर्चा होणार आहे. दोन्ही नेते भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. त्यांचा हा दौरा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे. या दौऱ्यात भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात होऊ घातलेल्या व्यापक व्यापार कराराचे प्रारुप निर्धारित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतफप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी युरोपियन महासंघाचे व्यापार प्रतिनिधीमंडळही व्यापक चर्चा करणार आहे. भारताच्या उद्योगजगताचे लक्ष या दौऱ्याकडे लागले असून त्यातून सकारात्मक फलनिष्पत्ती होण्याची अपेक्षा आणि प्रतीक्षा साऱ्यांनाच लागलेली आहे.
Comments are closed.