भारत नवीन मार्ग शोधत आहे

कच्च्या तेलासाठी आता ‘होर्मुझ’वरील अवलंबित्व कमी करण्याचा विचार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मध्यपूर्वेतील युद्धामुळे तेलाच्या किमती वाढत असल्याने आखाती देशांकडून आशिया आणि युरोपला होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. या प्रदेशांना आखाती देशांकडून सर्वाधिक तेल आणि वायूचा पुरवठा होत असतो. मात्र, आता या मार्गाद्वारे अनेक अडचणी येत असल्याने भारत इतर ठिकाणांहूनही तेल आणि वायू आयात करण्याचा विचार करत आहे. साहजिकच भारत आता केवळ होर्मुझच्या सामुद्रधुनीवर किंवा आखाती देशांवर अवलंबून नसल्याचे दिसून येत आहे.

भारताची सरकारी कंपनी, हिंदुस्तान पेट्रोलियमने, एका निविदेद्वारे अंगोलाकडून 20 लाख बॅरल तेल खरेदी केले आहे. मध्यपूर्वेकडील महागड्या तेलाची उपलब्धता कमी झाल्यामुळे भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या पश्चिम आफ्रिका आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशातील तेलाकडे वळत आहेत. याशिवाय, देशातील सर्वात मोठी तेल रिफायनरी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनदेखील पश्चिम आफ्रिकेतून कच्चे तेल खरेदी करण्याचा विचार सुरू केला आहे.

भारत पूर्वी तेल आणि वायू आयातीसाठी मध्यपूर्वेवर अवलंबून होता, परंतु आता नवीन मार्गांचा शोध घेत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील बंदीमुळे भारताच्या एलपीजी पुरवठ्यात सर्वाधिक व्यत्यय आला आहे. आशियाला जाणाऱ्या मध्य-पूर्वेकडील लाखो बॅरल कच्च्या तेलाची किंमत ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेंचमार्क दरात अचानक झालेल्या वाढीमुळे आशियाई रिफायनर्सचा खर्च वाढल्यामुळे त्यांना पर्याय शोधण्यास किंवा उत्पादन कमी करण्यास भाग पडले आहे.

Comments are closed.