भारताला अंतर्गत घटकांचाही धोका!

हवाईदल प्रमुखांचा इशारा : हनी ट्रॅप्सव्यतिरिक्त सायबर हल्ल्यांद्वारेही हेरगिरीची भीती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

परदेशी हेरगिरी नेटवर्क आता केवळ हनी ट्रॅप्सपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते सायबर हेरगिरी आणि इतर पद्धतींद्वारे भारतीय संरक्षण क्षेत्राशी संबंधित संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये सोशल मीडियावरील लव्ह ट्रॅप, मल्टी-लेव्हल मार्केटिंग आणि डेट ट्रॅप यांसारख्या पद्धतींचा वापर केला जात आहे. या नव्या पद्धतींमुळे आता अंतर्गत व्यक्ती किंवा घटकांकडूनही माहिती उघड होण्याचा मोठा धोका निर्माण झाल्याची भीती हवाईदल प्रमुख आशुतोष दीक्षित यांनी व्यक्त केली आहे.

2026 मध्ये हनी ट्रॅपची चार प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये नौदलाचे दोन जवान, हवाई दलाचे एक विंग कमांडर आणि एका माजी सैनिकाचा समावेश असल्याचे हवाईदल प्रमुखांनी सांगितले. अशा धोक्यांना तोंड देण्यासाठी तांत्रिक आणि संस्थात्मक स्तरावर अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सरकारी क्षेत्र, डीआरडीओ लॅब आणि खाजगी संरक्षण कंपन्यांसाठी सुरक्षा प्रणाली देखील विकसित केल्या जात असल्याचे आशुतोष दीक्षित म्हणाले. खासगी संरक्षण कंपन्यांना सुरक्षित नेटवर्क वापर आणि योग्य सॉफ्टवेअर निवडण्याबाबत सल्ला देण्यासाठी एक एजन्सी देखील कार्यरत आहे. कंपन्यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यामुळे बहुतेक प्रकरणांमध्ये सायबर सुरक्षेचे धोके टाळता येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत सोमवारी आयोजित केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा शिखर परिषद 3.0 मध्ये त्यांनी आपले मत मांडले.

हनी ट्रॅप की सायबर हेरगिरी

भारतीय सशस्त्र दलांनी आणि त्यांच्याशी संलग्न संशोधन संस्थांनी परदेशी हेरगिरीच्या जाळ्यांना तोंड देण्यासाठी तांत्रिक आणि संस्थात्मक सुरक्षा उपाययोजना विकसित केल्या आहेत. परदेशी हेर आता पारंपरिक हनी ट्रॅपऐवजी सायबर हल्ले आणि ऑनलाइन प्रलोभन व फसवणुकीच्या इतर प्रकारांद्वारे लष्करी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे भारतीय हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी सांगितले.

सोशल मीडिया अन् प्रेमाचे जाळे

प्रेमप्रकरणांच्या माध्यमातून माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर हा हेरगिरीच्या मोठ्या आव्हानाचा केवळ एक छोटासा भाग आहे. सरकारी संशोधन संस्थांपासून ते खाजगी संरक्षण कंपन्यांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. हे केवळ हनी ट्रॅपचे प्रकरण नाही. हे खरे तर सायबर हेरगिरीचे प्रकरण आहे. आजकाल हेरगिरी सायबर माध्यमांतून आणि इतर अनेक पद्धतींनी केली जाते.  लोकांना विविध प्रकारच्या प्रलोभनांनी आमिष दाखवले जाते. हनी ट्रॅप हे त्यातील केवळ एक भाग आहे. याशिवाय इतरही अनेक पद्धती असल्याचे त्यांनी नमूद केले. मल्टी-लेव्हल मार्केटिंग आणि जास्त व्याजदराने कर्ज देणाऱ्या योजनाही सक्रिय आहेत. आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे. आम्ही त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पद्धतशीरपणे काम करत असल्याचेही ते पुढे म्हणाले.

Comments are closed.