ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करणारा भारतीय गोलंदाज निवृत्त, कसोटी-वनडेत केला होता कहर!

भारताचा वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरॉननं शुक्रवारी (10 जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानं सोशल मीडियावर याची पुष्टी केली आहे. वरुण अ‍ॅरॉन एकेकाळी त्याच्या स्फोटक गोलंदाजीसाठी खूप प्रसिद्ध होता. परंतु तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली फारशी चमक दाखवू शकला नाही.

वरुण अ‍ॅरॉन भारतासाठी 18 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहेत. त्यानं टीम इंडियासाठी 9 कसोटी सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या. याशिवाय त्याच्या नावे 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 विकेट्स आहेत. वरुण अ‍ॅरॉन 2010-11 विजय हजारे ट्रॉफी दरम्यान चर्चेत आला होता. या स्पर्धेत त्यानं 153 किमी/ताशी वेगानं गोलंदाजी केली होती. त्यानं ऑक्टोबर 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी कसोटी पदार्पण केलं होतं. त्यानं त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र दुखापतीमुळे त्याची कारकीर्द फारशी पुढे जाऊ शकली नाही. असं असलं तरी अ‍ॅरॉन झारखंडकडून नियमितपणे देशांतर्गत क्रिकेट खेळत होता.

वरुण अ‍ॅरॉननं त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिलं की, “गेल्या 20 वर्षांपासून मी वेगवान गोलंदाजीचा थरार अनुभवत आहे. आज मी अधिकृतपणे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. माझं कुटुंब, मित्र, सहकारी, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि चाहते यांच्याशिवाय हा प्रवास शक्य झाला नसता. माझ्या कारकिर्दीत मला अनेक गंभीर दुखापतीना झगडावं लागलं. हे केवळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील फिजिओ, प्रशिक्षक आणि प्रशिक्षकांच्या अथक समर्पणामुळे शक्य झालं आहे.”

36 वर्षीय वरुण अ‍ॅरॉननं 52 आयपीएल सामन्यांमध्ये 33.66 च्या सरासरीनं 44 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना 2014 मध्ये तर शेवटचा कसोटी सामना 2015 मध्ये खेळला होता. या वेगवान गोलंदाजाला टी20 क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही.

हेही वाचा –

इंग्लंडचा भारतात वनडे रेकॉर्ड खूपच खराब! इतक्या वर्षांपूर्वी जिंकली होती शेवटची मालिका
‘विराटमध्ये खूप क्रिकेट शिल्लक…’, हेड कोच अँडी फ्लॉवरची प्रतिक्रिया, कर्णधारपद मिळणार?
“मला जेवणात विष दिलं होतं”, महान टेनिसपटू नोवाक जोकोविचचा खळबळजनक खुलासा!

Comments are closed.