भारताचे रशियासोबत १९ करार आहेत
पुतीन यांचा दौरा यशस्वी : अखंडित तेल पुरवठा करण्याचीही हमी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यात 19 महत्त्वपूर्ण करार करण्यात आले असून संरक्षण करारांवर मुख्य भर देण्यात आला आहे. दोन्ही देशांनी आगामी काळात द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला असून त्या दिशेने वेगाने पावले टाकण्याचा निर्धारही व्यक्त केला. पुतीन यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी दोन्ही देशांनी संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये निकट सहकार्य वाढविण्यासंबंधी व्यापक चर्चा केली आहे. तसेच भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला सातत्यपूर्ण आणि अखंड इंधन पुरवठा करत राहण्यास रशिया सज्ज असल्याची हमीही पुतीन यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी व्यापक चर्चा झाली. सकाळी काही काळ या दोन्ही नेत्यांनी बंद दरवाजाआड एकमेकांशी प्रत्यक्ष चर्चा केली. यावेळी तेथे अन्य कोणी अधिकारी अगर नेता उपस्थित नव्हता. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी, हैदराबाद हाऊस येथे झालेल्या प्रतिनिधी मंडळांच्या चर्चेत भाग घेतला. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्रित निवेदन प्रसिद्धीस दिले. संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. दोन्ही नेत्यांच्या चर्चेत संरक्षण, आर्थिक सहकार्य, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि संबंधित मुद्दे यांचा समावेश होता, अशी माहिती नंतर देण्यात आली. भारत आणि रशिया यांच्यात भविष्यकाळात होणाऱ्या बहुआयामी सहकार्याची रुपरेषा या चर्चेत निर्धारित करण्यात आल्याचे समजते.
भारत शांततेचा पक्षधर
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे आणि शांतता प्रस्थापित व्हावी, अशी भारताची प्रारंभापासूनची इच्छा आहे. या युद्धात भारताची भूमिका त्रयस्थाची नाही. तर आम्ही शांततेचे पक्षधर आहोत. युद्ध हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही, ही आमची भूमिका सर्वज्ञात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्याशी चर्चा करताना केले, अशीही माहिती देण्यात आली आहे.
व्यापार 100 अब्जपर्यंत वाढविणार
येत्या पाच वर्षांमध्ये भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार करण्यासंबंधातील चर्चा पुढेही होणार आहे. युरेशियन आर्थिक संघटनेशीही असा करार करण्यात येणार आहे. दोन्ही देशांमधील व्यापार दोन्ही देशांच्या चलनात करणे आणि डिजिटल पेमेंट सुविधा एकमेकांना उपलब्ध करुन देण्याच्या संदर्भातही दोन्ही देशांचे एकमत झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
ऊर्जा क्षेत्रात भागीदारी
इंधन तेल, नैसर्गिक इंधन वायू, पेट्रोरसायने, आण्विक ऊर्जाक्षेत्र आणि कोळशाचे रुपांतर इंधन वायूत करण्यासंदर्भात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. भारत रशियाकडून इंधन तेलाची खरेदी करीत आहे. अलिकडच्या काळात हे प्रमाण बरेच कमी झाले आहे. मात्र, भारताला युरेनियमचा पुरवठा करण्याचे रशियाने मान्य केले असून त्यामुळे अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढणार आहे.
संरक्षण आणि सामरिक सहकार्य
संरक्षण सामग्री संशोधन क्षेत्रात एकमेकांशी सहकार्य वाढविण्यात येणार आहे. शस्त्रास्त्रांची संयुक्त निर्मिती करण्यावर भर देण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन निर्माण केलेल्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला रशिया मोठ्या प्रमाणात सहकार्य करणार आहे. महत्त्वाचे आणि अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान रशिया भारताला देणार आहे. ‘इंद्र’ कार्यक्रमाअंतर्गत दोन्ही देशांचे संयुक्त सेना सराव यापुढेही होत राहतील, असे दोन्ही देशांकडून ठरविण्यात आले आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान संशोधन, उत्पादन
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. या क्षेत्रात संशोधनावर भर देण्यात येईल. संशोधन आणि विकास, स्टार्टअप कंपन्यांच्या स्थापनेसाठी सहकार्य, दुर्मिळ धातूंचा शोध आणि उत्पादन या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील. डिजिटल तंत्रज्ञान संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रातही दोन्ही देश एकमेकांना साहाय्य करतील. विशेषत: संरक्षण सामग्रीचे संशोधन आणि विकास करण्यासाठी भारताला रशियाच्या ज्ञानाचा उपयोग होणार आहे. या क्षेत्रात दोन्ही देश एकत्र काम करणार आहेत, असे दिसून येते.
सांस्कृतिक सहकार्य, सार्वजनिक सहकार्य
सांस्कृतिक क्षेत्रातही दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. दोन्ही देशातील जनता एकमेकांच्या अधिक नजीक यावी, असे प्रयत्न केले जाणार आहेत. कलेच्या क्षेत्रात संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करणे, सांस्कृतिक आणि इतर प्रकारचे पर्यटन वाढविणे, एकमेकांच्या देशात सांस्कृतिक सणांचे आणि उत्सवांचे आयोजन करणे, आदी मार्गांनी या क्षेत्रात दोन्ही देश सहकार्य वाढविणार आहेत.
बहुआयामी सहकार्य करणार
संयुक्त राष्ट्रसंघ, ब्रिक्स, एससीओ आणि जी-20 अशा आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमांमधून दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. या आंतरराष्ट्रीय संस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने संयुक्त प्रयत्न केला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे, यासाठी रशिया भारताला सहकार्य आणि समर्थन देईल, असे दोन्ही देशांकडून ठरविण्यात आले.
दहशतवादाविरोधात संघर्ष
दहशतवादाविरोधात संघर्ष करण्याची दोन्ही देशांची भूमिका यापुढेही राहणार आहे. दहशतवाद संपविण्यासाठी दोन्ही देश एकमेकांना यापुढेही सहकार्य करीत राहतील. कोणत्याही कारणास्ताव कोणाच्याही दहशतवादाचे समर्थन कोणाकडूनही होऊ नये, असे भारताचे धोरण आहे. रशिया या धोरणाला पाठिंबा देत आहे. यापुढेही दोन्ही देश या संदर्भात एकमेकांना सहकार्य केले जाणार आहे.
मोदींना रशिया भेटीचे आमंत्रण
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला भारतात बोलाविल्यामुळे आणि भारतात माझे शानदार स्वागत केल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. मीही त्यांना रशिया भेटीचे आमंत्रण दिले असून ते त्यांनी स्वीकारले आहे, अशी भलावण या शिखर परिषदेच्या अखेरीस अध्यक्ष पुतीन यांनी केली. त्यानंतर रात्री साडेआठच्या आसपास रशियाला परत जाण्यासाठी अध्यक्ष पुतीन यांचे भागातून निर्गमन झाले.
Comments are closed.