भारताने तेलाचा पुरेसा साठा तयार केला आहे.

स्थिती आव्हानात्मक, पंतप्रधान मोदी यांचे निवेदन : स्वयंपाकाच्या घरगुती गॅस पुरवठ्याला प्राथमिकता, चिंतेचे कारण नाही

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

‘मध्यपूर्वेत युद्ध होत असल्याने जगभरात आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली असली तरी भारताला कमीत कमी झळ पोहचावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. भारतात पुरेसा तेलसाठा असून गेल्या 11 वर्षात धोरणात्मक तेलसाठ्यात वाढ करण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजनांवर कार्याला प्रारंभ केला असून भारतातील शेतकरी आणि सर्वसामान्य लोक यांना झळ पोहचू नये, अशाप्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत,’ असे दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. त्यांनी सेमवारी लोकसभेत मध्यपूर्वेतील युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेली ऊर्जापुरवठा स्थिती या विषयांवर भारताची स्थिती आणि धोरणे स्पष्ट केली.

हे युद्ध लवकरात लवकर थांबावे आणि स्थिती पूर्ववत व्हाही, हीच भारताची इच्छा आहे. भारताने नेहमीच शांततेच्या मार्गाने आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविले जावेत, अशी भूमिका घेतली आहे. आजही भारत याच भूमिकेशी ठाम आहे. संबंधित देशांना या भूमिकेची माहिती दिली गेली आहे. युद्धामुळे कोणतेही प्रश्न सुटत नसून सामोपचार हाच मार्ग असल्याचे त्यांनी भाषणात स्पष्ट केले.

युद्धाचा परिणाम दीर्घकालीन

या युद्धाचा परिणाम दीर्घकाळ राहील, अशी शक्यता आहे. अशी स्थिती निर्माण होईल, हे लक्षात घेऊन आमच्या सरकारने आधीपासूनच सज्जता ठेवली आहे. भारताकडे पुरेसा तेलसाठा आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये आम्ही जाणवपूर्वक कच्च्या तेलाच्या साठा क्षमतेत मोठी वाढ केली आहे. आमच्याकडे 53 लाख टन कच्च्या इंधन तेलाचा धोरणात्मक साठा असून ही क्षमता 65 लाख टनांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

होर्मुझची सामुद्रधुनी हा तेलव्यापाराचा महत्त्वाचा मार्ग असून तो मुक्त असावा. या मार्गात अडथळे आणण्यात येऊ नयेत. तसेच तेल उपसा केंद्रे आणि ऊर्जा उत्पादन केंद्रे यांच्यावर युद्धात हल्ले केले जाऊ नयेत. भारतात होर्मुझ सामुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणात कच्चे इंधन तेल, नैसर्गिक वायू आणि इतर पेट्रोलियम पदार्थ येतात. भारतासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. भारताचा पुरवठा विनासायास व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपला तेलपुरवठा सुरक्षित रहावा, यासाठी केंद्र सरकारने अनेक पर्याय निर्माण केले आहेत. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा वेशेष गट स्थापन करण्यात आला असून तो सातत्याने कार्यरत आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

अनेक देशांकडून आयात

भारत आज अनेक देशांकडून कच्चे इंधन तेल आणि नैसर्गिक वायू यांची आयात करीत आहे. पूर्वी भारत 27 देशांकडून अशी आयात करत होता. आता गेल्या 11 वर्षांमध्ये आम्ही 41 देशांकडून ही आयात करीत आहोत. भारताला त्याच्या आवश्यकतेच्या 87 टक्के कच्चे इंधन तेल आणि 60 टक्के इंधन वायू आयात करावा लागतो. हा पुरवठा विनाअडथळा होत रहावा, यासाठी आयातीचे विविधीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

खते, कोळसा पुरेशा प्रमाणात…

भारतात खते आणि कोळसा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. या युद्धपरिस्थितीचा भारतातील वीजनिर्मितीवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. सर्व वीज उत्पादन केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात कोळशाचा साठा आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार खतांचा पुरवठा करण्याची केंद्र सरकारची क्षमता असून पुरेसा खतसाठाही उपलब्ध आहे, असे दिलासादायक प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.

साडेतीन लाख भारतीय परतले

युद्ध होत असलेल्या देशांमध्ये जवळपास 1 कोटी भारतीय नागरिक कामासाठी वास्तव्यास आहेत. इराणमध्येही 10 हजार भारतीय आहेत. या युद्धाचा प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत साडेतीन लाख भारतीय भारतात सुखरुप परत आलेले आहेत. संबंधित देशांमधील भारतीय दूतावास त्या देशांमधील भारतीय नागरिकांच्या सातत्याने संपर्कात आहेत, अशीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

भारताच्या कूटनीतीला यश

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक खंडित झाली असूनही भारताने सातत्याने इराणशी कूटनीतीक चर्चा केल्याने इंधन वायू घेऊन येणाऱ्या भारताच्या नौकांनी आतापर्यंत सुरळीतपणे ही सामुद्रधुनी पार केली आहे. आतापर्यंत सहा नौका भारतात आल्या आहेत. हे भारताच्या मुत्सद्देगिरीचे यश आहे, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लोकसभेत केलेल्या निवेदनात केले.

इथेनॉल मिश्रणामुळे सुसह्याता

पेट्रोलियमची आयात कमी व्हावी, म्हणून भारताने गेल्या 11 वर्षांमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे धोरण स्वीकारले आहे. आता आम्ही पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण करीत आहोत. तसेच गेल्या 10 वर्षांमध्ये देशात युरिया निर्माण करण्यासाठी 6 नवी उत्पादन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यामुळे सध्याच्या या अभूतपूर्व स्थितीतही सुसह्याता अनुभवास येत आहे. हे धोरणांचे यश आहे, अशीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात दिली.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी…

ड परिस्थिती कठीण असली तरी ती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत सक्षम

होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त असावी, ऊर्जा केंद्रांवर हल्ले होऊ नयेत

ड भारताकडे 53 लाख टन कच्च्या तेलाचा साठा, वाढविण्यासाठी प्रयत्न

ड युद्धस्थितीतील देशांमधील भारतीय सुरक्षित, दूतावासांकडून साहाय्यता

ड आपण सर्वांनी संयम, एकजुटीने परिस्थिती हाताळण्याची आवश्यकता

ड भारत नेहमीच शांततेचा पक्षधर, सध्याच्या स्थितीतही हीच ठाम भूमिका

Comments are closed.